शहापूरनजीक तिहेरी अपघात; विशेष सरकारी वकील अजय मिसर जखमी

शहापूर पुलाजवळील नाशिक- मुंबई महामार्गावर गुरुवारी (दि. १७) रात्री ११ वाजेच्या सुमारास बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाहीने दुभाजकाचा कठडा तुटून विरुद्ध दिशेने येणार्‍या कंटेनर व कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या कारचे नुकसान झाले असून, त्यांच्यासह सुरक्षारक्षक व कारचालक जखमी झाले आहेत.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना शुक्रवारी (दि. १८) सकाळी उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज जायचे होते. त्यामुळे ते इनोव्हा कार (एमएच १५, डीएम ३९३७) घेऊन गुरुवारी रात्री आठ वाजता नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शहापूर पुलाजवळील नाशिक- मुंबई महामार्गावर शिवशाही बस, कंटेनर व कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात बसमधील आठ ते दहा प्रवासी जखमी झाले असून, कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात अजय मिसर हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सुखरूप आहेत.