नाशकात अचानक टीव्हीवरचे स्टार, सोनी, झी चॅनेल झालेत बंद; ‘हे’ आहे कारण…

नाशिक : भारतातील तीन सर्वात मोठ्या मीडिया कंपन्या, स्टार, सोनी आणि झी, नवीन टॅरिफ ऑर्डर 3.0 च्या अंमलबजावणीमुळे केबल प्लॅटफॉर्मवर बंद झाल्या आहेत. मात्र या मिडीया कंपन्यांनी प्रक्षेपण कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केले आहे. परिणामी ग्राहकांचा आम्हा केबल ऑपरेटर यांना रोष पत्करावा लागत आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केबल ऑपरेटर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डिजिटल केबल टेलिव्हिजन कंपन्यांची सर्वोच्च संस्था ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशन (एआयडीसीएफ) ने सांगितले की, त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. कारण यामुळे खर्च 25 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील जातील. केबल फेडरेशन यावर कायदेशीर मार्ग काढण्याचा विचार करत आहे. मात्र अचानक प्रक्षेपण बंद झाल्याने ग्राहकांचा केबल चालकांवर रोष वाढत असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,आम्ही केबल टी.व्ही ग्राहकांना मल्टी सर्व्हिस ऑपरेटरकडून सेवा घेऊन ती सेवा केबल ग्राहकांपर्यंत पुरवित आहोत. गेल्या ३० वर्षापासून आम्ही या व्यवसायात आहोत.

केबल टी.व्ही. अ‍ॅक्ट १९९५ अमेन्टमेंट २०१७ अनुसार नवीन नियम सेटअप बॉक्सचे लागु झाले आहे, त्याचे पालन करीत आहोत. शनिवार सकाळी ११ वा. पासून एमएसओने स्टार, झी व सोनी या चॅनल्सचे बुके व एक चैनल किंमती आधारावर प्रक्षेपण बंद केले आहे.याबाबत कुठलीही पूर्व सुचना किंवा नोटीस दिलेली नाही. केबल टी. व्ही. कायदयाप्रमाणे पंधरा दिवसांची नोटीस व ग्राहकांसाठी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली नाही. परिणामी आम्ही केबल ऑपरेटर ग्राहकांच्या रोशाला बळी पडत असून आम्ही महिन्याचे पैसे आगाऊ ग्राहकांकडून घेतले आहे व ते आम्ही एमएसओला जमा केलेले आहेत. ही सर्व्हीस ग्राहकांना आम्ही पुरवित आहोत. याबाबत आपण एमएसओकडून चॅनल बंद का करण्यात आले याची विचारणा करावी.हे कायदयाचे उल्लंघन झालेले आहे. याबाबत आम्हाला योग्य तो न्याय मिळवून दयावा,अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आव्हाड, सेक्रेटरी विनय टाकसाळे, संजय गुजरानी,माजी अध्यक्ष नूर भाई ,मनीष म्हात्रे, बबन घोडे आदी यावेळी उपस्थित होते.