दोन हजाराची लाच पडली महागात, हवालदार सापडला रंगेहाथ

नाशिक : कोर्टात केस न पाठविण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनमध्येच वाद मिटविल्याबद्दल २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तक्रारदाराचे नातेवाइकाबरोबर भांडण झाल्याने अभोणा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तक्रारदार आणि नातेवाइकामधील वाद मिटला. मात्र याबाबतची केस कोर्टात न पाठविण्यासाठी हवालदार रमण तुळशीराम गायकवाड याने २ हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली. गुरूवार दि. ५ रोजी हवालदार गायकवाड याने २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून त्याला पकडण्यात आले. हवालदार गायकवाड याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.