सराईत दुचाकी चोरट्यास अटक; सात दुचाकी जप्त

गंगापूर पोलिसांनी सापळा रचत सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ४ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या. अनिकेत नंदलाल अहिरे (वय २२, रा.मिशन मळा, कॅनडा कॉर्नर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाशिक शहरात दुचाकी चोरी करणार्‍या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला. १ जानेवारी २०२२ रोजी पोलीस नाईक मोहिते यांना दुचाकी चोरटा मिशन मळा, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने त्यास सापळा रचून अटक केली. पोलीस चौकशीत त्याने गंगापूर, अंबड, सातपूर पोलीस ठाणे हद्दीत सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सात दुचाकी जप्त केल्या आहेत.