घरमहाराष्ट्रनाशिकदेवळा तालुक्यात चोरट्या वाळु वाहतुकीने घेतला दोन मजुरांचा बळी

देवळा तालुक्यात चोरट्या वाळु वाहतुकीने घेतला दोन मजुरांचा बळी

Subscribe

दंड भरा आणि चोरटी वाळु वाहतुक करा, अशा महसूल विभागाच्या मानसिकतेने देवळा तालुक्यात दोन बळी घेतले. वाळु घेऊन जात असलेला ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ट्रॉलीमधील दोन मजुर ठार झाले तर, दोन गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मदत करण्याऐवजी ट्रॅक्टरचालक फरार झाला. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत दबल्या गेलेल्या मजुरांना बाहेर काढले.

देवळा तालुक्यातील निंबोळा- महाल पाटणे शिवारातील गिरणा उजव्या कालव्यालगत बापू दलपत सावंत यांच्या घराजवळ वाळूने भरलेला ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरवरील दोन मजुर ठार, तर दोन जण जखमी झाले. या अपघाताच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळु उपसा आणि चोरट्या वाहतुकीचा गंभीर प्रश्नदेखील पुढे आला आहे. या अपघाताप्रकरणी देवळा पोलिसांनी ट्रॅक्टरचालक योगेश भाटेवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार शनिवार, २६ जानेवारीला वाळूने भरलेला विना क्रमांकाचा ट्रॅक्टर महालपाटणेकडून डोंगरगावच्या दिशेने अवैध वाळु घेऊन जात होता. वेगात असलेल्या या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर कालव्याच्या डाव्या बाजूस बापू दलपत सावंत यांच्या घराशेजारील शेतातलगत उलटला. यावेळी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीमधील विशाल नवरे, सचिन नवरे, सुनील सोनवणे, सोनू नवरे (सर्व राहणार ब्राह्मणगाव, कसाडपाडे, ता. बागलाण) हे कामगार ट्रॉलीखाली दाबले गेले. त्यात त्यात सुनील पवन सोनवणे (वय २२ ) हा युवक जागीच ठार झाला, तर सोनू नवरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही शेतकऱ्यांनी या घटनेची तत्काळ देवळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. तसेच, मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर ट्रॅक्‍टर मालक योगेश उत्तम भाटेवाल (महालपाटणे, ता. देवळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

दंड भरा आणि चोरटी वाहतूक करा

या ट्रॅक्‍टरद्वारे नेहमीच चोरटी वाळू वाहतूक होत होती. याच कारणावरुन गेल्या वर्षभरात संबंधित ट्रॅक्टरच्या मालकावर महसूल विभागाने कार्यवाही करून चार वेळा दंडवसूलीही केली होती. मंगळवार, २२ जानेवारीला महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करून हा ट्रॅक्टर सोडून दिला. ट्रॅक्टरवर नंबरही नाही आणि याच ट्रॅक्टरचा पुन्हा पुन्हा चोरट्या वाळु वाहतुकीसाठी वापर होत असल्याचे निदर्शनास येऊनदेखील कठोर फौजदारी करण्याऐवजी महसूल विभागाकडून केवळ दंड वसुल करण्यावरच समाधान मानले जात असल्याचे दिसून आले. महसूल विभागाने पकडले तरीही केवळ दंड भरावा लागतो, असे असल्यानेच चोरट्या वाहतुकीला पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.

मदत करण्याऐवजी ट्रॅक्टरचालक फरार

ट्रॅक्टर उलटताच ट्रॉलीमधील दबल्या गेलेल्या कामगारांना मदत करण्याऐवजी ट्रॅक्टरचालक योगेश भाटेवाल हा घटनास्थळावरुन फरार झाला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दाबल्या गेलेल्या मजुरांना अथक प्रयत्नानंतर कसेबसे बाहेर काढले. त्यात सुनील पवन सोनवणे (वय २२ ) हा युवक जागीच ठार झाला, तर सोनू भिका नवरे (वय २१) या युवकाचे मालेगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले. अपघातात जखमी झालेल्या विशाल बापू नवरे व सचिन किसन नवरे या दोन जखमी मजुरांवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -