जिल्ह्यात ७२ हजार नागरिकांना मिळणार हक्काची घरं

महा आवास योजनेंतर्गत १८ हजार घरे साकारणार

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून तब्बल ७२ हजार ९३५ नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे. या अभियानाच्या उद्दिष्ठ्यपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार करावी, त्यासाठी कामाच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नाशिक जिल्हा महा आवास अभियान २ जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, समाजातील गरजू व घरापासून वंचित असलेल्या लोकांना ‘महा आवास’ अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य देवून त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावेत.

घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत बांधतांना त्यांचा कामाचा दर्जा खालावणार नाही याकडे संबधित अधिकारी व यंत्रणा यांनी कटाक्षाने व जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अधिकाधिक तळागाळातील गरजू घटकांपर्यत घरकुलाचा लाभ पोहचेल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व कामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके, जयंत ठोंबरे आदी उपस्थित होते.

७२ हजार घरे पूर्ण
या वर्षातील महा आवास अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ५०५९ व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत १७१५ अशी एकूण ६७७४ घरकुले नाशिक जिल्ह्यात पुर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील ६९९५५ लाभार्थ्यांपैकी ५८६३५ (८५.४९%) घरकुले पुर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये देखील १९१११ घरकुलांपैकी १४३०० (७५.४२%) घरकुले पुर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतील शिल्लक घरकुले या महा आवास अभियान-ग्रामीण २.० मध्ये पुर्ण करण्यात येणार आहेत.

१८ हजार घरे साकारणार
आवास प्लस (ड यादी) मध्ये २८८१७१ कुटुंबांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी २३४४७६ कुटुंब सिस्टीमद्वारे पात्र झालेले आहेत. त्यांची अंतिम प्राधान्यक्रम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर यादी ग्रामपंचायत निहाय तयार झाल्यावर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सन २०२१-२२ करीता प्राप्त उद्दिष्ट १८६६८ ची मंजुरी महा आवास अभियान ग्रामीण २.० मध्ये देण्यात येईल. महा आवास अभियान-ग्रामीण २.० मध्ये असलेले १ ते १० उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यावेळी व्यक्त केला.