केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा नुकसानग्रस्त भागांत धावता दौरा

महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचा एनडीआरएफच्या माध्यमातून आढावा

लासलगाव : केंद्र सरकारने सातत्याने पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांना मदत केली आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचा एनडीआरएफच्या माध्यमातून आढावा घेण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून आपत्तीग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती करून देणार असल्याचे केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लासलगाव येथे सांगितले.पूरस्थिती ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरू नये याकरिता आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

अतिवृष्टीमुळे लासलगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी, व्यापारी, आदिवासी कुटुंबे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी धावती भेट दिली. प्रताप सागर बंधारा परिसरात राहणारे जवळपास २० कुटुंबातील सदस्यांचे मंगळवारी झालेल्या पावसामुळे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. अनेक संसार उघड्यावर आले आहे. आपली व्यथा मांडताना या कुटुंबांचे अश्रू अनावर झाले. जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप, सुवर्णा जगताप आणि लासलगाव शहर विकास समिती यांनी आपत्तीग्रस्त आदिवासी कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती करून दिली.

यावेळी प्रांत अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, रमेश पालवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे, भाजपाचे शंकर वाघ, संजय शेवाळे, ज्योती शिंदे, शैलजा भावसार, रूपा केदारे, रेल्वे मंडळाचे सदस्य राजेंद्र चाफेकर, दत्तूलाल शर्मा, नितीन शर्मा, ग्रा.स. दत्ता पाटील, अमोल थोरे, भैया नाईक, ओम चोथानी उपस्थित होते. लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने मनमाड गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी राजेंद्र कराड, संदीप उगले, चंद्रकांत नेटारे, महेंद्र हांडगे, भूषण वाळेकर, हमीद शेख यांनी निवेदन दिले. तर लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने रिक्त पदे भरण्यात यावे अशे मागणीचे निवेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, डॉ. स्वप्नील पाटील यांनी दिले.