दुष्काळी गावांना जलजीवन योजनेत प्राधान्य

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार : जलजीवन मिशन मार्चअखेर पूर्ण करण्याचे आदेश

नाशिक : उन्हाळ्यास तीव्र पाणीटंचाई जाणवत असलेल्या देवळा, सुरगाणा, नांदगाव, मनमाड व इतर भागाचे सर्वेक्षण करून टँकरने पाणीपुरवठा होणार्‍या भागातील पाणी पुरवठा योजना प्राधान्याने मंजूर करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिले आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची गुरुवारी (दि.13) त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी मंत्री डॉ. पवार म्हणाल्या, राजापूर येथील ४० खेडे पाणीपुरवठा योजना ही देखील कृती आराखड्यात घेऊन त्यासाठी लागणारा निधी केंद्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. योजना मार्गी लावण्याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना सूचना केल्या. जिल्ह्यातील इगतपुरी, कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळा, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, बागलाण, मालेगाव, येवला, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यातील प्रस्तावित व नवीन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला.

रेट्रो फिटिंग अ/ब आणि प्रस्तावित नवीन १६१२ योजनांचा आढावा घेण्यात आला. एकूण १६१२ योजनांपैकी केवळ १७७ योजनांची कामे पूर्ण झाली असून १०२९ योजनांच्या कामांचे अंदाजपत्रके तयार असल्याबाबतची माहिती यावेळी मुख्य अभियंता यांनी दिली. ही कामे उन्हाळ्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी म्हणजेच मार्च २०२२ पूर्वी पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २४ मोठ्या योजना असून त्यापैकी १५ योजना या ७०7 कोटी रुपयांच्या असून त्यांचे डीपीआर पूर्ण झाल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंता यांनी दिली. यापैकी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लासलगाव येथे डॉ.पवार यांनी यापूर्वी पाण्यासंदर्भात बैठक घेतली.

महिला व स्थानिकांनी पाणीपुरवठा योजना मंजूर होणेबाबत अनेक दिवसांची मागणी होती. जलजीवन मिशन या योजनेतून मंजूर १६.६७ कोटी रुपयांच्या लासलगाव १६ गाव पाणीपुरवठा योजनेस तसेच घोटी पाणी पुरवठा योजनेस १८.३९ कोटी रुपयांस प्रशासकीय मान्यता मिळाल्याबाबत मंत्री डॉ.पवार यांनी स्थानिकांना पाण्याचा वापर विचारात घेऊन नियोजन करण्याची सूचना अधिकार्‍यांना केली.

ठेकेदारांची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी

कामांची केंद्र शासनामार्फत त्रयस्थ समितीकडून तपासणी करून कामात्त दिरंगाई व हलगरजीपना केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करणार असल्याचे देखील इशारा यावेळी ना.डॉ.भारती पवार यांनी दिला.