आरोग्य कर्मचार्‍यावर हल्ला ; जिल्ह्यातील लसीकरण बंद

ग्रामीण भागात लसीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांनी केले कामबंद आंदोलन

Vaccination: 25% of citizens in india have been fully vaccinated

सिन्नर येथे आरोग्य कर्मचार्‍यास मारहाण झाल्यानंतर या प्रकरणाचे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. ग्रामीण भागात लसीकरण करणार्‍या कर्मचार्‍यांनी सोमवारी (दि.20) कामबंद आंदोलन केल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण बंद झाले आहे. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयित व्यक्तिविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पास्ते (ता.सिन्नर) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असताना गावातील काही लोकांनी लसीकरण केंद्रात रांगेत उभे न राहता कर्मचार्‍यांकडे लस देण्याची मागणी केली.यास नकार दिल्यानंतर या लोकांनी येथील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केली.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आरोग्य संघटनेच्यातर्फे सोमवारी (दि.20) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण पूर्णपर्ण बंद होते.

संघटना पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांना निवेदन दिले.मारहाण करणार्‍या लोकांना अटक होत नाही, लसीकरण केंद्राला पोलीस संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात लसीकरण होणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रत्येक लसीकरण केंद्रावरील लसीकरणाची संख्या मर्यादीत करावी अशी मागणी देखील यावेळी केली. यावेळी आंदोलनात मँग्मो संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील, विजय हळदे, डॉ. प्रदीप जायभावे, डॉ. सुभाष मांडगे, शोभा खैरनार, वैशाली पगार, राजेंद्र बैरागी, विजय सोपे, मधुकर आढाव, जी. पी. खैरनार, विजय देवरे, अबू शेख, सुभाष कंकरेज, दीपक आहिरे, एकनाथ वाणी, संजय पगार, रंजना शिंदे, बाळासाहेब चौधरी, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब कोठूळे, श्रीकांत आहिरे,अरूण आहेर, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रत्येक दिवशी सुमारे 50 हजार व्यक्तींना कोरोना लस दिली जाते. परंतु, आरोग्य कर्मचार्‍यांच्या संपामुळे त्यावर परिणाम झाला आहे. सोमवारी दिवसभरात सुमारे 30 ते 35 हजार व्यक्तिंना डोस मिळाला. कर्मचार्‍यांच्या संपाचा आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
           – डॉ. शैलेश निकम, माता व बालसंगोपन अधिकारी