उद्घाटनाच्या औपचारिकतेनंतर लसीकरण थांबणार

The first order of serum vaccine from the central government was also the price

कोरोना लसीकरणाच्या वृत्ताने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या आनंदावर केंद्र सरकारने विरजण टाकले आहे. अतिशय मोजक्या संख्येने महाराष्ट्राला लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यातच दुसर्‍या टप्प्यातील लसीचे डोस वेळेत मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाची औपचारिकता शनिवारी (दि. १६) आटोपल्यावर केंद्राकडून पुढील निर्देश येईपर्यंत लसीकरण सुरु केले जाणार नसल्याचे सूत्रांकडून कळते.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु करण्याची घोषणा केंद्राने केली खरी; परंतु महाराष्ट्राला डोस उपलब्ध करुन देताना हात आखडता घेतला. महाराष्ट्राला १७ ते साडेसतरा लाख डोसची गरज असताना केंद्राने केवळ ९ लाख ७३ हजार लसींचे डोस उपलब्ध करुन दिले. एका व्यक्तीला या लसीचे दोन डोस दिले जातील. मात्र, या दोन डोसमधील कालावधी हा २८ दिवसांपेक्षा अधिक नसावा. त्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यास पहिल्या डोसचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील डोस उपलब्ध होईपर्यंत ही मोहीम काही दिवस थांबवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

कर्मचार्‍यांना त्रास होतो की नाही हे बघणार..

लसींच्या मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्याने शासनाकडून अचानक लसीकरण केंद्रांची संख्याही घटवण्यात आली आहे. त्याची माहिती राज्य आरोग्य विभागाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये देण्यात आली. तसेच हे लसीकरण केवळ शनिवारी एक दिवस होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यादिवशी ज्या आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल त्यांना लस दिल्यानंतर काही त्रास झाला का, त्यांच्या आरोग्यात काही फरक जाणवला का याचा अहवाल त्याच दिवशी सायंकाळी केंद्राला पाठवायचा आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवस या कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी करायची आहे. केंद्राकडून लसीकरण पुन्हा कधी सुरु केले जाणार हे कळवले जाणार आहे.

लसीकरण केंद्र

जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, उपजिल्हा रुग्णालय येवला, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, सय्यद पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक, शहरी आरोग्य केंद्र सातपूर नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी. बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा १ मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव अशा एकूण १६ ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ४३ हजार तर शहरात १६ हजार डोस उपलब्ध

नाशिकसाठी राज्य शासनाकडून केवळ ४३ हजार ४४० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी शहरात सुमारे १६ हजार डोस दिले जाणार आहेत. पहिल्या फेरीत १८ हजार १३५ शासकीय व १२ हजार ४८० खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे.