नाशिक : शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढतच असून ज्या ठिकाणी संदीप आठवले या तरुणाचा 6 युवकांनी भरदिवसा खून केला होता त्याच जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अचानक चौक, साईबाबा मंदिर मागची बाजू येथील १० ते १२ दुचाकी गाड्यांची शुक्रवारी रात्री तोडफोड करत समाजकंटकांकडून दहशत पसरविण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तिघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोसह परिसरात खून सत्र सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिडको येथील साईबाबा मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर व राम मंदिर परिसरात घरासमोर असलेल्या दहा ते बारा दुचाकी, चारचाकींचे समाजकंटकांनी तोडफोड करून नुकसान केले आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाठोपाठ एक खून करण्याचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे दुचाकी तोडफोड करण्याचे प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबड पोलिसांना गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. भावाला का मारले या वादातून ही गाड्यांची तोडफोड झाल्याचे सांगितले जाते.
तोडफोड करणारे खून झालेल्या संदिपचे नातलग
जुने सिडको परिसरातील वाहनांची तोडफोड करणारे युवक गुरुवारी खून झालेल्या संदीप आठवले याचे नातलग तरुण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यावेळी हे तरुण गाड्यांची तोडफोड करत होते तेव्हा “आमच्या भावाचा मर्डर झाला आहे, आमच्या भावाचे सीसीटीव्ही व्हिडिओ देता का?” असे वाक्य उच्चारात तोडफोड करत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.