घरमहाराष्ट्रनाशिकलम्पीबाबत दक्षता हाच उपाय

लम्पीबाबत दक्षता हाच उपाय

Subscribe

खासगी-शासकीय पशुवैद्यकांंच्या समन्वयाची गरज

जायखेडा : राज्यासह बागलाण तालुक्यात लम्पी रोगाचा विळखा अधिक घट्ट होत असताना शासकीय यंत्रणा मात्र तोकडी पडत आहे. या रोगावर अद्याप प्रभावी मात्रा उपलब्ध नसल्याने सद्यस्थितीत दक्षता हा एकमेव उपाय समोर आहे. अशा परिस्थितीत शासकीय व खासगी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून पशुधन वाचवण्याची गरज व्यक्त होत आहे. जनावराला लम्पीची लक्षणे आढळल्यास खासगी पशुवैद्यकांनी शासकीय यंत्रणेला तातडीने कळविण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यात सुमारे १ लाख ३० हजारांवर पशुधन आहे. विशेषतः गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. आतापर्यंत ४० ते ५० जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. तालुक्यात अपुरा कर्मचारी वर्ग, उपचारासाठी लागणार्‍या साधनांचा अभाव यामुळे उपचार करताना शासकीय यंत्रणेला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. तरीही फैलाव रोखण्यासाठी प्रशासन व खासगी पशुवैद्यकांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ज्या गतीने हालचाली व्हायला हव्या; त्या होताना दिसत नाहीत.

- Advertisement -

परिणामी, शेतकर्‍यांना खासगी पशुवैद्यकीय सेवा पुरवणार्‍यांवर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु, त्यांच्यावरही उपचार करताना मर्यादा येत आहेत. शासकीय पशुवैद्यकीय कर्मचार्‍यांचे प्रमाण पाहता एका कर्मचार्‍याच्या वाट्याला किमान १० ते १५ हजार जनावरे येतात. यातील ५० टक्के जनावेर बाधित झाली तरी ६ ते ७ हजार जनावरांवर एक कर्मचारी कसा काय नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे वेळेत उपचार होण्यासाठी पशुपालक खासगी पशुवैद्यकांची मदत घेत आहेत. परंतु, त्यांच्यावरील निर्बंध आणि त्यांना येत असलेल्या अडचणी यामुळे योग्य उपचार शक्य होत नाही. यामुळे प्रशासनाने खासगी पशुवैद्यकांवर लादलेले निर्बंध हटवण्याची गरज असल्याचे पशुपालकांनी म्हटले आहे.

खासगी पशुवैद्यकांशी समन्वयाची गरज 

तालुक्यात सुमारे ४० खासगी पशुवैद्यक सेवा देत आहेत. लम्पीबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन व उपचाराबाबत माहिती दिल्यास निश्चित फायदा होईल. आणीबाणीच्या परिस्थितीत शासकीय व खासगी पशुवैद्यक यांनी समन्वय साधूनच बागलाण तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे.

बागलाणमधील सद्यस्थिती

  • सरकारी पशुवैद्यकीय दवाखाने : २३
  • सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी : १२
  • खासगी पशुवैद्यकीय अधिकारी : ४०
  • जनावरांची संख्या : १,३०,०००
  • लम्पीबाधित जनावरे : ४० ते ५०

पशुसंवर्धन विभाग बागलाण व खासगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुपालकांनी गोचिड, गोमाशा, चिलटे, मच्छरपासुन आपल्या पशूंचे रक्षण करावी. त्यासाठी गोठ्याची स्वच्छता राखावी. गोठ्यात धूर करणे, जनावरांवर फवारणी करणे गरजेचे असते. तसेच शासकीय लसीची मात्रा उपलब्ध झाल्यानंतर गावातील लसीकरण पूर्ण करणे, बाधित जनावरांवर उपचारांसाठी तालुका स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली जाणार आहे.

– डॉ. चंदन रुद्रवंशी, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, बागलाण

शेतकर्‍यांचे पशुधन वाचले पाहिजे हीच भूमिका घेऊन आम्ही सेवा बजावत आहोत. लम्पीसंदर्भात प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. औषधे उपलब्ध करून द्यावीत.

– डॉ. कपिल अहिरे, तालुकाध्यक्ष, खासगी पशुवैद्यक संघटना

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -