पाण्यासाठी ३ किमीचा रस्ता झाडला, खडीही वेचली

कोकणवाड्याच्या महिलांच्या श्रमदानातून रस्ता दुरूस्ती

nandgaon rasta dursti
रस्ता दुरुस्तीसाठी भर उन्हात शालेय विद्यार्थ्यांसह गावातील महिलांनी पुढाकार घेतला होता.

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने वाड्या-वस्त्यांवर टँकरची मागणीही जोर धरू लागली आहे. मात्र, खराब रस्त्याचे कारण पुढे करीत काही वाड्या-वस्त्यांवर टँकर पोहचू शकत नसल्यानेच कोकणवाडा येथील वस्तीवरील महिलांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने तब्बल तीन किलोमीटर अंतराचा रस्ता झाडून हाताने खडी वेचून काढून साहेब, रस्त्यावरील बाजुला केली खडी आता तरी पाण्याची मिळेल का गाडी? अशी भावनिक साद महिलांनी घातल्याने गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांनी दखल घेत लगेचच पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले.

तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वीस वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या तालुक्यातील कोकणवाडा या खराब रस्त्यामुळे पाण्याचे टँकर येत नाही. अखेर, येथील आदिवासी महिला व शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सकाळी हाताने तीन किलोमीटर रस्त्यावरील उघडी पडलेली सर्व खडी बाजूला करुन रस्ता मोकळा केला आणि आता पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे. पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी अनेकवेळा करुनही केवळ रस्ताबरोबर नसल्याचे कारण सांगून आजपर्यंत एकही टँकर येथे जात नव्हता. म्हणुन सकाळी अचानक सर्व महिलांनी एक बैठक बोलावून रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेऊन उपाशीपोटी विद्यार्थ्यांसह सकाळपासून भर उन्हात हाताने, तर काही चप्पलने रस्त्यावर असलेली सर्व खडी बाजूला करुन शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिल्यावर दुपारपर्यंत टँकर उपलब्ध होईल, असे आश्वासन देण्यात आले. कोकणवाडा येथील ठकूबाई पवार, वंदना महाले, सीमा दिवे, रंगुबाई घोगर, सकुबाई पागे, गंगुबाई घुगसे, लक्ष्मीबाई गवळी, इंदूर दरवडे, आशाबाई घाटाळ, पारुबाई डोळे, सुल्याबाई महाले, सारिका मानभाव, शोभा दिवे, सागर घाटाळे, रोहित दिवे, बबलू डोळे, सूरज डोळे, समृध्दी डोळे, सरला गावित, नंदिनी घोगर, राणुबाई घुगसे, तानुबाई वळवी, लखन वळवी, संजय वळवी, मथ्याबाई डोळे, जमनाबाई दरवडे, नर्मदा महाले, सुशिला कोते, जयश्री डोळे, मंगल कोते, हिराबाई भोये, आरती बरफ आदींनी रस्ता दुरूस्तीसाठी परिश्रम घेतले.

हाताने केली खडी दूर

महिला तसेच विद्यार्थ्यांनी सलग चार तास काही हाताने, तर काही चप्पलने खडी बाजुला करुन रस्ता मोकळा करुन दिल्याने व गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी दखल घेतल्याने दिवसाआड सदर वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.