विनायक रानडेंना पहिला मु.शं.औरंगाबादकर जीवन गौरव पुरस्कार

सावानाच्या वैभवशाली वाटचालीत मोलाचे योगदान देणारे कै.मु.शं. औरंगाबादकर यांच्या स्मृतीनिमित्ताने २०२० पासून देण्यात येणारा पहिला ग्रंथभूषण मु.शं औरगांबादकर जीवन गौरव पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान ग्रंथालय आणि जगभर वाचन संस्कृती रुजवणारे कार्यकर्ता म्हणून विनायक रानडे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सवानाच्या वस्तुसंग्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जातेगावकर म्हणाले, वाचन चळवळ वृद्धीगत व्हावी, या उद्देशाने सावानाच्या वतीने यावर्षीपासून राज्यस्तरीय ग्रंथभूषण मु.शं औरगांबादकर जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण बुधवार, दि.११ मार्च रोजी मु.शं.औरगांबादकर यांच्या स्मृतीदिनी प.सा. नाट्यगृहात केले जाणार आहे. ११ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह , मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. एक वर्ष वाचन संस्कृती वाढविणारा कार्यकर्ता आणि संस्था तर दुसर्‍या वर्षी ग्रंथपाल व वाचनालयास हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यावेळी सावानाचे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहसचिव अभिजीत बगदे, शंकर बोराडे , देवदत्त जोशी, भानुदास सौचे, अर्थसचिव शंकर बर्वे, उदयकुमार मुंगी, संजय करंजकर, बी.जी वाघ आदी उपस्थित होते.

२ मार्चला जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
सावानातर्फे ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार असून पुरस्काराचे वितरण २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता केले जाणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक अनुराधा पाटील यांच्या हस्ते पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथसाहित्याचे अभ्यासक प्राचार्य दिलीप धोंडगे उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथ तुमच्या दारी वाचक चळवळ सर्वांच्या मदतीने जगभर गेली. मु.शं.औरंगाबादकर पुरस्कार हा ग्रंथ प्रचार करणार्‍या असंख्य हातांचा पुरस्कार आहे. हा व्यक्तीचा नसून संकल्पनेचा व कुसुमाग्रजांच्या विचारांचा पुरस्कार आहे.
विनायक रानडे पुरस्काराचे मानकरी