घरमहाराष्ट्रनाशिकबारागाड्यांच्या उत्साहात नियमांचा धुराळा

बारागाड्यांच्या उत्साहात नियमांचा धुराळा

Subscribe

सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात ओझरला पार पडला उत्सव, पोलिसांची बघ्याची भूमिका

ओझर – चंपाषष्ठीनिमित्त गुरुवारी (दि.९) ओढण्यात आलेल्या बारागाड्यांच्या उत्साहात कोरोना नियमांचा पुरता धुराळा उडाल्याचे दिसून आले. प्रशासनाने घातलेली बंदी झुगारुन बारागाडे अमाप उत्साहात ओढले गेले. यावेळी पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतलेली होती.

ओझर परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव कोरोना संसर्ग लक्षात घेता यंदाही रद्द करण्यात आला. मात्र, असे असतानाही बंदी झुगारुन बारागाड्या ओढल्या गेल्या. प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिल्यानंतर पहाटेपासूनच मंदिरात रांगा लागल्या होत्या. यंदाही प्रशासनाने बारागाड्या ओढण्याला परवानगी नाकारल्याने भाविकांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी नाराजी होती. मानकरी कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या चौकात बारागाड्या ठेवून पूजन केले. यात्रा कमिटीच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कोरोना नियमांचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात होते. यात्रा कमिटीकडून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय.. अशा जयघोषात खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली. दुपारी बाणगंगेच्या नदीचे दर्शन करून अश्व मंदिराकडे नेण्यात आला.

- Advertisement -

खंडेराव महाराजांचा जयघोष करत कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, वरचा माळीवाडा, मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, पगार- गवळी, रास्कर, भडके, कदम व इतर १२ बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी मल्हाररथ असे अश्वाच्या धार्मिक पूजन केले. यात्रा कमिटीच्या वतीने सर्व सदस्यांनी यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय पगार, खजिनदार अशोक शेलार, उपाध्यक्ष युवराज शेळके, कार्याध्यक्ष राम कदम, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम आदी मान्यवर यात्रा सुरळीत पार पाडावी, यासाठी खबरदारी घेत असल्याची माहिती उपाध्यक्ष युवराज शेळके यांनी दिली. पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अरुण गायकवाड, भूषण शिंदे, इम्रान खान, बालकदास बैरागी, एकनाथ हळदे, नितीन करंडे, कारभारी यादव, भास्कर पवार, अनुपम जाधव आदी यावेळी उपस्थित होते. अशा वातावरणात बारागाड्या ओढण्याला सुरुवात झाली. त्यात नियमांचा पुरता फज्जा उडाला. त्यामुळे आता पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -