नाशकात दौरा राज ठाकरेंचा अन् स्वच्छता मोहीम शिवसेनेची

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात शिवेसेनेचे श्रमदान

MNS President Raj thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या स्वच्छतेसाठी आता शिवसेना पुढे आली आहे. महापालिकेने या प्रोजेक्टकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी स्वतः या स्मारकाच्या साफसफाईचे आदेश दिले आणि स्वतः उभं राहून ही स्वच्छता करून घेतली. विशेष म्हणजे उद्या (दि. १६) पासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौर्‍यावर असून त्यापूर्वी ठाकरे स्मारकाच्या निमित्ताने, मनसे सेनेतील ही जवळीक दिसून आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जागतिक दर्जाचे स्मारक असावे, या संकल्पनेतून मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांनी नाशिक येथे जीव्हीके कंपनीच्या विशेष सहाय्याने स्मारक उभारण्यात आले. महापालिका व जीव्हीके कंपनीच्या वतीने नाशिकमध्ये उभारण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे स्मारक व ऐतिहासिक संग्रहालयाचे लोकार्पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असतांना राज ठाकरे यांनी बड्या कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून विविध प्रकल्प साकारले. यात टाटांच्या मदतीने पांडवलेण्याच्या पायथ्याशी बोटॅनिकल गार्डन तसेच रिलायन्सच्या माध्यमातून गोदा पार्कच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले. ठाकरे टाटा, अंबानी, शिर्के, रेड्डी यांसारख्या उद्योगपतींच्या मदतीने नाशिकमध्ये प्रकल्प साकारले. या प्रकल्पांचा शुभारंभही तितक्याच थाटात संपन्न झाला. परंतू मनसेची सत्ता जाताच राज ठाकरेंचे ड्रीम प्रोजेक्ट दुर्लक्षित केले गेले. परंतु, शिवसेनेच्या वतीने महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांनी महापालिका अधिकार्‍यांसह या स्मारकाला भेट देत पाहणी केली. यानंतर महापालिका कर्मचार्‍यांनी स्मारकात स्वच्छता मोहीम राबवली.

गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या या स्मारकात शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे मनसे, शिवसेना मैत्रीचा नव्या अध्याय सुरू होतो की काय अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण हे स्मारक मनसेच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असून राज ठाकरेंच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शिवेसेनेच्या या मोहिमेने राजकीय लक्ष वेधून घेतले आहे.