घरमहाराष्ट्रनाशिककधीकाळचा वेटर ठरला अभियांत्रिकीत अव्वल

कधीकाळचा वेटर ठरला अभियांत्रिकीत अव्वल

Subscribe

‘पीव्हीजी’तील नीतेशच्या जिद्दीला माजी विद्यार्थ्यांचा हातभार

कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले, तर कधी मिस्तरीच्या हाताखाली कलाकुसर केली. कधी मेसमधील डबे पोहोचवून पोटाची खळगी भरली, तर कधी पाण्याच्या टाक्या साफ करून फीसाठी पैसे जमा केले. संकटे रोजच आलीत. या संकटांवर मात करीत पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण तेथेही नशीब आडवे आले. आर्थिक परिस्थिती अभावी अंतिम टप्प्यात शिक्षण थांबवण्याची वेळ आली. महाविद्यालयाचेच काही माजी विद्यार्थी पुढे आले. त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि थांबलेल्या शिक्षणाची गाडी पुढे सरकली. अर्थात ही परिस्थिती केवळ चांगला अभ्यास करूनच बदलू शकते हे ठावूक असल्याने त्याने मानपाठ एक करून अभ्यास केला. या कष्टाचे फळ म्हणजे अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षात तो विशेष प्रावीण्यासह ‘पीव्हीजी’ महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. नीतेश भगवानराव सोनटक्केची ही जिद्दीची ही कहाणी..

परभणीजवळील आलेगाव येथील रहिवासी असलेल्या नीतेशच्या कुटुंबियांकडे शेती आहे. मात्र, ती करण्यायोग्य परिस्थिती नाही. त्यामुळे वडील दुसर्‍याच्या शेतावर राबतात. दहावीला इंग्रजीत नापास होऊ या भीतीने नीतेशने दोन दिवस निकालच बघितला नाही. मात्र, बाहेरून समजले की, तो ७४ टक्के गुण मिळवून शाळेत दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. पुढील तीन महिने लोकांची गुरे चारायला घेऊन जाण्याची जबाबदारी नीतेशकडे होती. त्यानंतर त्याने नांदेडला अभियांत्रिकीच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र, तेथेही इंग्रजी भाषा ‘जानी दुश्मन’ बनली. इंग्रजीतून शिकवले जात असल्यामुळे तो सुरुवातीला काहीसा खचला, पण त्याही परिस्थितीत विषय समजून घेत त्याने अभ्यास केला आणि बेसिक सायन्समध्ये ९९ गुण मिळवले. या यशाने त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला. डिप्लोमा करीत असताना प्रा. संतोष क्षीरसागर, विभागप्रमुख प्रा. गजानन कदम यांच मार्गदर्शनाने त्याला योग्य दिशा दाखवली. अडचणींकडे सकारात्मकदृष्टीने बघत त्या सोडवण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. डिप्लोमा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने बी.ई. मॅकॅनिकलला नाशिकमधील पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. हे करताना त्याला प्रवेश शुल्क कोठून आणायचे असा प्रश्न होता. त्यामुळे त्याने सुरुवातीच्या काळात नाशिकमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. याचबरोबर एका खासगी मेसमधील जेवणाचे डबे पोहोचवल्याने दोन वेळचे जेवण विनामूल्य मिळत होते. याशिवाय सकाळच्या वेळी वर्तमानपत्र वाटायला जाणे, मिस्तरीच्या हाताखाली कामे करून त्याने फीसाठी पैसे गोळा केले.

- Advertisement -

एज्युक्वॉईनचा मदतीचा हात

बहिणीच्या लग्नात पैसे खर्च झाल्याने नीतेशच्या कुटुंबियांनी त्याला अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षी फीचे पैसेच पाठवले नाही. त्यामुळे एक वर्ष शिक्षण न घेण्याचा निर्णय त्याने घेतला; परंतु पीव्हीजीमधील माजी विद्यार्थ्यांच्या एज्युक्वॉईन संस्थेने त्याला मदतीचा हात दिला. त्यामुळे बी. ई. होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. केवळ उत्तीर्णच झाला नाही, तर महाविद्यालयातील सर्व शाखांमध्ये त्याने प्रथम क्रमांकाचे यश मिळवले. आता तो चांगल्या नोकरीच्या शोधात आहे.

कधीकाळचा वेटर ठरला अभियांत्रिकीत अव्वल
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -