नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी २० डिसेंबरला जाहीर होणार प्रभाग रचना

ओबीसी आरक्षणाची तत्कालीन स्थिती लक्षात घेत पुढील कार्यवाही केली जाणार

नाशिक:महापालिकेच्या १३३ जागांसाठी तीन सदस्यीय पद्धतीने तयार केलेल्या ४४ प्रभागांच्या कच्चा रचनेच्या आराखड्याची शुक्रवारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर लागलीच संबंधित प्रभाग रचना अंतिम करून पालिका व निवडणूक विभागातील अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने अंतिम रूप दिले जाणार आहे. त्यानंतर ही प्रभाग रचना २० डिसेंबरला जाहीर होणार असून त्यानंतर हरकती-सूचना व ओबीसी आरक्षणाची तत्कालीन स्थिती लक्षात घेत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मार्चमध्ये राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका अपेक्षित असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केले होता. नाशिकच्या १३३ जागांसाठी ४४ प्रभाग असणार असून त्यात ४३ प्रभाग तीन सदस्यीय तर एक प्रभाग चार सदस्यीय असणार आहे आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्त जाधव यांनी उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. आयोगाच्या निकषांप्रमाणे कच्चा आराखडा तयार करण्याचे काम करणे अपेक्षित असताना कच्ची प्रभाग रचना सुरू झाल्यानंतर त्यात नगरसेवकांकडून फेरफार होत असल्याचे आरोप झाले. ही बाब लक्षात घेत आयुक्त जाधव यांनी असे प्रकार आढळले तर संबंधिताला बडतर्फ केले जाईल असा इशारा दिला होता. दरम्यान, ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत लक्षात घेत एक दिवस आधीच म्हणजेच कच्ची प्रभागरचना करून आराखडा निवडणूक आयुक्तांनी खास दुतामार्फत पाठवला गेला. या रचनेवर ११ दिवसांनी आयोगाने छाननी प्रक्रिया सुरू केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक प्रभागावर निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच पालिका अधिकारी यांच्यात बारकाईने चर्चा झाली. त्यात रस्ते, चतु:सीमा, नदी-नाले याबाबतच्या नियमांचे पालन झाले का याची तपासणी केली गेली. काही प्रभागांमध्ये ब्लॉक जुळवणीबाबतचे आक्षेप लक्षात घेत त्यावरूनही स्पष्टीकरण घेत प्रभागरचना अंतिम केली गेली.

अशी होईल पुढील कार्यवाही

कच्च्या प्रभाग रचनेच्या छाननीनंतर राज्य निवडणूक आयोग पुढील दोन दिवसांत त्यास अंतिम स्वरूप देईल. त्यानंतर आठवडाभरात ज्या ज्या महापालिकांची कच्ची प्रभागरचना अंतिम झाली, ती जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबत सुधारित वा त्यावेळच्या सूचना लक्षात घेऊन आरक्षणाची प्रक्रिया होईल. तसेच त्यानंतर हरकती व सूचनांची प्रक्रिया होणार आहे.