घरमहाराष्ट्रनाशिकनार-पार, अंबिका, औरंगा नद्यांचे पाणी वळण योजनांद्वारे बागलाणला मिळावे; अन्यथा...

नार-पार, अंबिका, औरंगा नद्यांचे पाणी वळण योजनांद्वारे बागलाणला मिळावे; अन्यथा…

Subscribe

सटाणा : नार-पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळण योजनांद्वारे वळविण्याच्या शासनाच्या प्रस्तावांमध्ये बागलाण तालुक्याचा समावेश नसणे ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. बागलाण तालुका या वळण योजनांमधून वगळला जाणे हे तालुकावासीयांसाठी मोठी दुर्दैवी घटना ठरणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याची त्यांना विनंती करणार असल्याचे माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी सांगितले.

याबाबत बोलताना माजी आमदार चव्हाण यांनी, राज्यात भाजपा व शिंदे गटाचे सरकार असूनही या वळण योजनांचे पाणी बागलाण तालुक्यातील शेती सिंचनाला उपलब्ध होऊ शकत नाही. बागलाणचा या प्रकल्प अंतर्गत समावेश व्हावा, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार व आमदार डॉ.राहुल आहेर करीत असल्याचे स्पष्ट केले. बागलाण तालुका हा कायम अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो. फक्त गेल्या वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नसले तरी भविष्यकाळात तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. नार-पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांच्या वळण योजनांच्या माध्यमातून दहा टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते.

- Advertisement -

नार-पार-अंबिका-औरंगा या पश्चिम वहिनी नदी खोर्‍यातील पाणी चणकापूर धरणात टाकण्याचे प्रस्तावित आहे. या धरणातून डावा कालवा काढून बागलाण तालुक्यातील कायमस्वरूपी अवर्षणप्रवण व टंचाई ग्रस्त गावांना उपलब्ध झाल्यास पिंपळदर, दराणे, नवेगाव, तिळवण, जुने-नवे निरपूर, तरसाळी वनोली, औदाणे, कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे, चौगाव, करहे, अजमेर सौंदाणे, सुराणे, देवळाणे, वायगाव, रातीर, रामतीर, सारदे, ब्राह्मणगाव, जुनी नवी शेमळी, आराई, धांदरी या गिरणा व आरम नदी खोर्यातील गावांना त्याचा लाभ होऊ शकतो. तसेच सदरचा कालवा पुढे वाढविल्यास मोसम नदी खोर्‍यातील सोळा गाव काटवण परिसरातील सर्वच गावे सिंचनाखाली येऊ शकतात त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या बागलाण तालुक्यातील सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. नार-पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळण योजनांद्वारे बागलाणला मिळाले नाही, तर सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिलेला आहे.

भाजपा-सेना महायुतीच्या काळात आपण स्वत: विधानसभेत सातत्याने हा प्रश्न मांडून तत्कालीन जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच नार-पार, अंबिका, औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याच्या कामांचा डी.पी.आर.मध्ये समावेश करण्याचे आश्वासन गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिले होते. : दीपिका चव्हाण, माजी आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -