घरमहाराष्ट्रनाशिकमनमाडची पाणीटंचाई बनली गंभीर

मनमाडची पाणीटंचाई बनली गंभीर

Subscribe

जिल्हाधिकार्‍यानी २ जूनला आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्याने शहरात नळांद्वारे नागरिकांना १० जूननंतरच पाणी मिळेल, अशी परिस्थिती आहे.

मनमाडला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण कोरडे पडल्यामुळे शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील काही भागांत एक महिन्यापासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्याविना जगावे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान आज खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. जिल्हाधिकार्‍यानी आवर्तन तातडीने सोडणे शक्य नसून २ जूनला आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शहरात नळांद्वारे नागरिकांना १० जूननंतरच पाणी मिळेल, अशी परिस्थिती आहे.

एकीकडे शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट असताना दुसरीकडे पालिका प्रशासन लोकप्रतिनिधीवर, तर लोकप्रतिनिधी प्रशासनावर खापर फोडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरी सुविधा मिळण्यासाठी नगरसेवकांना निवडून दिले. मात्र, त्यांच्या हलगर्जीपणाचा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांपासून मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरण परिसरात पाऊस झाला नाही. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा हा पालखेड धरणातून आवर्तनाद्वारे मिळणार्‍या पाण्यावर अवलंबून आहे. धरणातून फेब्रुवारी महिन्यात मिळालेले पाणी आतापर्यंत पुरले. मात्र, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. आता गाळमिश्रित गढूळ पाणी उरले आहे. त्यातून पाणीपुरवठा करणे शक्य नसल्यामुळे रविवार (दि.२६) पासून पालिका प्रशासनाने शहरात पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे शहरातील सव्वा लाख नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाणी आणावे कोठून, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

- Advertisement -

नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार, आमदार पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेऊन पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली. मात्र, जिल्हाधिकार्‍यानी तातडीने आवर्तन सोडणे शक्य नसल्याचे सांगून २ जूनपासून आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील अनेक भागांत एक महिन्यापासून पाणी पुरवठा झालेला नाही. एक हंडा पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करण्याची वेळ हजारो नागरिकांवर आली आहे. ही परिस्थिती पालिका प्रशासनासोबत नगरसेवक व राजकीय पक्षांच्या हलगर्जीपणा मुळेच आल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसतील, तर शासनाने मनमाड नगर परिषद बरखास्त करून येथे प्रशासक राजवट लागू करावी, अशी मागणी होत आहे

चौकशी करणार

जिल्हाधिकारी सूरज मांढऱे म्हणाले, मुख्याधिकार्‍यांकडून पाणी संपल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला उशीरा का मिळाली, याची स्वतंत्र चौकशी केली जाईल. त्याआधी मनमाडच्या नागरिकांना त्वरित पाणी कसे उपलब्ध होईल, याचे नगरपालिकेने नियोजन करावे. १० दिवस तात्पुरत्या पाण्याची सोय करावी, अशा सूचना दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -