घरमहाराष्ट्रनाशिकगुड न्यूज: महाराष्ट्र दिनी शहरवासियांना मुकणेतील पाण्याची भेट

गुड न्यूज: महाराष्ट्र दिनी शहरवासियांना मुकणेतील पाण्याची भेट

Subscribe

शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्णत्वास आली असून महाराष्ट्र दिन अर्थात १ मे पासून धरणातून नवीन नाशिक परिसराला पाणी पुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे.

शहरासाठी राबविण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्णत्वास आली असून महाराष्ट्र दिन अर्थात १ मे पासून धरणातून नवीन नाशिक परिसराला पाणी पुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे. एकाच वेळी शिवाजीनगर जलकुंभावरुन पाणीपुरवठा बंद केल्यास तांत्रिक अडचणी उदभवू शकतात. हा धोका लक्षात घेत सुरुवातीला केवळ १० एमएलडी पाणीपुरवठा बंद करुन तो विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातून करण्यात येत आहे. आठवडाभरात शिवाजीनगर जलकुंभातून नवीन नाशिकसाठी होणारा पाणीपुरवठा पूर्णत: बंद होणार आहे. त्याचा फायदा शहरातील अन्य भागात होणार असून काही महिन्यातच २४ तास पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

नाशिक शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने मुकणे धरणातून थेट जलवाहिनीची योजना राबविण्याचे चार वर्षांपूर्वी निश्चित केले. या योजनेअंतर्गत नाशिक शहरापासून सोळा किलोमीटर दूर असलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. २६६ कोटी खर्चाची ही योजना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्णत्वास येणे आवश्यक होते. परंतु काम अपूर्ण असल्याने मुख्य म्हणजे मुकणे धरणात पाणी असल्याने जलविहिरीचे काम रखडले होते. त्यानंतर विल्होळीपर्यंतच जलवाहिनीचे काम रखडले होते तेदेखील पूर्ण होणे बाकी होते. ते पूर्ण झाल्यानंतरदेखील अनेक अनुषंगिक कामे बाकी होती. ती पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी डिसेंबर महिन्यात योजनेची पाहणी केल्यानंतर मार्च महिन्यात प्रत्यक्ष धरणातून पाणी आले पाहिजे, असे संबंधित ठेकेदारास बजावले होते. त्यानंतर योजना पूर्ण झाली आणि धरणातून पाण्याचा उपसा करून पाइपलाइनमध्ये कुठे गळती आहे काय किंवा अन्य त्रुटी शोधण्याचे काम सुरू होते. त्यानंतर मुकणे पाईपलाईनव्दारे पाणी विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्याची चाचणी यशस्वी झाली. परिणामत: महाराष्ट्र दिनापासून नाशिक शहराला मुकणे धरणातून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

मुकणेतून शहराला ३० टक्के पाणी देण्याचे नियोजन

सध्या नवीन नाशिक परिसराला शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा मुकणे पाणीपुरवठा योजनेमुळे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातून होणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्राचा ताण कमी होणार आहे. आठवड्याभरात नवीन नाशिकसाठी पूर्णत: विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार आहे. आठवडाभरानंतर पाथर्डी, इंदिरानगर, श्रध्दा पार्क या भागांना विल्होळी केंद्रातून पाणीपुरवठा होणार आहे. टप्प्याटप्प्याने एकूण शहराच्या ३० टक्के भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रावरील ताण कमी झाल्यामुळे अन्य भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -