‘गद्दारांना घरातून निघणेही अवघड करू’; मा.मंत्री बबनराव घोलपांचा घणाघात

नवीन नाशिक : शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांना माफी नाही, त्यांना घरातून निघणे मुश्किल करू, असा सज्जड इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, माजीमंत्री बबन घोलप यांनी दिला. शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या नगरसेवक व पदाधिकार्‍यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच प्रभागात मेळावे घेण्याचा धडाका शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घोलप बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. खाल्ल्या मीठाला जे जागू शकले नाहीत ते दुसर्‍यांचे काय भले करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काही नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीसुद्धा झाले. परंतु, असे असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी केली. जे गद्दार निघाले त्यांचा आम्ही आमच्या पद्धतीने समाचार घेऊच. परंतु, आगामी निवडणुकांत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराच महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला. व्यासपीठावर माजी आमदार वसंत गिते, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक केशव पोरजे, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी, बालम शिरसाठ, मंदाताई दातीर बाळा दराडे उपस्थित होते.