Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक दुबळ्या प्रतिकारशक्तीमुळेच म्युकरमायकोसिसला निमंत्रण

दुबळ्या प्रतिकारशक्तीमुळेच म्युकरमायकोसिसला निमंत्रण

कोरोनामुक्त मधुमेही व्यक्तींना सर्वाधिक धोका, कांद्याच्या टरफलातही आढळते काळ्या बुरशीचे अस्तित्व

Related Story

- Advertisement -

विषाणूजन्य आजारांप्रमाणेच बुरशीजन्य आजारांचा संसर्गदेखील व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवरच ठरत असतो. त्यामुळेच कोरोनानंतर दुबळ्या झालेल्या प्रतिकारशक्तीचा फायदा घेत काळी बुरशी प्रभाव दाखवायला सुरुवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली ठेवा आणि लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

ओला कचरा, मृत प्राणी, शिळे अन्नपदार्थ, साठवलेला कांदा आणि श्वसनसंस्थेतही या काळ्या बुरशीचे अस्तित्व असते. नाकातील त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्यात सातत्याने तंतुमय पदार्थांचा संचार सुरू असतो. चिकट स्त्रावातून नकळत अनावश्यक घटक पोटात जाऊन नष्ट होत असतात. मात्र, ही प्रणाली बिघडली की संधीसाथू आजार हल्ला करतात. कोरोना संसर्ग झाल्यापासून पुढील ८ दिवस ते दीड महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिस आढळून आला आहे. गेल्या वर्षापर्यंत वर्षभरात केवळ दोन ते तीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून १० मेपर्यंत 147 रुग्ण तपासले असल्याची माहिती प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. उमेश तोरणे यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांनी तपासलेल्या रुग्णांपैकी ५ रुग्ण हे होम क्वारंटाईन होते. रुग्णालयात दाखल नसतानाही त्यांना म्युकरमायकोसिस आजार जडल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

२३ ते ३३ या वयोगटातील रुग्णांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा दुसरा स्ट्रेन हा अधिक गंभीर असल्याचे मतही डॉ. उमेश तोरणे यांनी व्यक्त केले.

असा पसरतो म्युकरमायकोसिस

हवा अथवा अन्य माध्यमातून नाकात गेलेली काळी बुरशी सायनसमध्ये (नाक, कान, कपाळ यांतील पोकळी) आपली वाढ सुरू करते. ही बुरशी सायनसमधील रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड निर्माण करते. त्यामुळे पेशी मरतात आणि काळी बुरशी त्यावर वेगाने वाढते. लसिका वाहिन्यांनाही या बुरशीने नुकसान केलेले असल्याने अशुद्ध पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रियाही मंदावते. वेळीच उपचार न झाल्यास नाकातून सायनस आणि पुढे जबडा, डोळे आणि शेवटी मेंदूपर्यंत पोहोचून एक-एक अवयव निकामी करत जाते.

हे उपाय ठरतील प्रभावी

नाकातील त्वचा ही सतत ओली असावी. त्यामुळे साध्या सलाईनचे (आयव्ही) १५ थेंब दिवसातून ३ ते ४ वेळा दररोज नाकात टाकावेत. तोंड आणि नाकाचे आरोग्य चांगले ठेवावे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही याकडे सातत्याने लक्ष ठेवा. कोणत्याही आजारात स्टेरॉईड्सचा वापर करायचा असेल तर तो अत्यंत अचूक प्रमाणात, गरज असेल तरच करावा. नाकात सतत बोट घालण्याची सवय घातक ठरते, ही सवय तातडीने बंद करावी. सिगारेट आणि तंबाखू खाणे बंद करावे.

आजाराची लक्षणे

 • तीव्रतेने डोकं दुखणे
 • चेहर्‍याचा भाग दुखणे
 • चावायला त्रास होणे
 • नाकातून लालसर पाणी येणे
 • नाक विनाकारण गच्च राहणे
 • नाकात सतत कोरडेपणा वाटणे
 • डोळा लाल होणे
 • दिसायला कमी होते
 • दोन-दोन प्रतिमा दिसणे
 • चेहर्‍याच्या संवेदना कमी होणे
 • नाकावर, डोळ्यांवर सूज येणे
 • गालावर बधिरपणा वाटणे
- Advertisement -