घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगेले होते कर्जवसुलीसाठी अन् घडला अ‍ॅसिड हल्ला

गेले होते कर्जवसुलीसाठी अन् घडला अ‍ॅसिड हल्ला

Subscribe

इंदिरानगर :  बजाज फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेलेल्या वसुली कर्मचार्‍यावर थकबाकीदाराकडून अ‍ॅसिड हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या प्रवेशद्वारावरच घडला आहे. या हल्ल्यात वसुली कर्मचार्‍यासह त्याच्यासोबत असलेला त्याचा भाऊ जखमी झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. गणेश बाबूराव फापाळे (वय ३१, रा. विडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व गणेश बाबूराव फापाळे यांच्या फिर्यादीनुसार, बजाज फायनान्स कंपनीच्या वसुलीचे काम करीत असल्याने सुनील देशमुख (रा. दातीर मळा, अंबड) यांच्याकडे कंपनीची थकबाकी होती. थकबाकीचा हप्ता घेण्यासाठी देशमुख यांना फाफळे हे दोन ते तीन दिवसांपासून कॉल करीत होते. त्यामुळे थकबाकीदार सुनील देशमुख याने वसुली कर्मचारी फापाळे यांना पैसे घेण्यासाठी कंपनीत बोलावले.

- Advertisement -

बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास फापाळे व त्यांचे चुलत भाऊ किरण फापाळे हे दोघेही जागोटा ग्रुपची नाशिक वेल्डिंग प्रोडक्स ट्रॉली अंबड या कंपनीत देशमुख यांच्याकडे कंपनीच्या पार्किंगमध्ये हप्ता घेण्यासाठी गेले. थकलेले पैसे मी देणार नाही, असे म्हणत सुनील याने फापाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देशमुख याने हातात असलेल्या प्लॅस्टिक बाटलीमधील अ‍ॅसिड फापाळे बंधूंवर टाकले. या हल्ल्यात दोघांचेही शरीरावरील कपडे जळाले. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फापाळे बंधू कपडे काढून नग्न अवस्थेत पाथर्डी फाटा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल झाले. या हल्ल्यात गणेश फापाळे हे तब्बल ४० टक्के भाजले तर त्यांचे मोठे बंधू किरण हे देखील ३० ते ३५ टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयित सुनील देशमुख यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३२६ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -