घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'मविप्र'च्या आखाड्यात कुठे 'भाऊबंदकी' तर कुठे 'दोस्तीत कुस्ती'

‘मविप्र’च्या आखाड्यात कुठे ‘भाऊबंदकी’ तर कुठे ‘दोस्तीत कुस्ती’

Subscribe

कोकाटे भावांमध्ये दुफळी

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही वादही उघडपणे दिसून येत आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू भारत कोकाटे यांच्यातील कौटुंबिक वाद उघद झाला आहे. आमदार कोकाटे हे राष्ट्रवादीत आहेत तर त्यांचे बंधु भारत कोकाटे यांनी नुकतेच शिवबंधन हाती बांधले. आता मविप्र निवडणुकीत आमदार कोकाटे हे परिवर्तन पॅनलचे उमेदवार आहेत. त्यांनी सत्ताधारी गटावर शरसंधान साधल्यानंतर प्रगती पॅनलच्या धुरंधर नेत्यांनी भारत कोकाटे यांनाच बोलते केले. भारत कोकाटे यांनी या संधीचे सोने करत ही संस्था विद्येचे माहेरघर आहे आणि तशीच राहू द्या. याला राजकारणाचा अड्डा होऊ देवू नका, असा सल्लाही दिला. थोडक्यात त्यांनी आमदारांचे नाव न घेता हा टोला लगावलेला असला तरी त्यांचा रोख सर्वांच्या लक्षात आला. मविप्र संस्थेचा मी सभासद नाही, असे त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती तयार झाली. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्राम पंचायतीच्या निवडनुकीत दोघांनी स्वतंत्र पॅनल तयार केले. यात भारत कोकाटे यांचा विजय झाला. ही संधी ओळखत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी भारत कोकाटेंना अलगद पक्षात घेतले. त्यामुळे कोकाटे यांच्या घरात दुफळी पडल्याचे चित्र उघड झाले आहे. आता मविप्र संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार कोकाटे विरुध्द भारत कोकाटे असा थेट सामना होणार नसला तरी आमदार कोकाटेंच्या विरोधात भारत कोकाटे जिल्हा पिंजून काढणार आहेत. त्यांना राजकीय मदत मिळू नये, यासाठी भारत कोकाटे प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. परिवर्तन पॅनलचे सक्षम उमेदवाराच्या विरोधात त्यांचा भाऊच प्रचारात उतरलाय म्हटल्यावर मतदारांमध्ये काही अंशी संभ्रम तयार होऊ शकतो. अर्थात, आमदार कोकाटे हे काही एवढ्या विरोधाला जुमाननारे नसल्यामुळे त्यांनीही हा विरोध गृहित धरलेला असेल. आता कोकाटे घरातील वादात कुणाचा जय आणि कुणाचा पराजय होतो, हे निकालाअंती स्पष्ट होईल. तोपर्यंत आरोपांची राळ उडताना दिसेल, हे मात्र निश्चित!

दोस्त-दोस्त ना रहा; पगार-आहेर 

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर हे मूळ देवळा येथील रहिवासी आहेत. या शहरातील विजय पगार यांच्याशी आहेरांची ‘शोले’ चित्रपटातील ‘विरु आणि जय’ यांच्यासारखी दोस्ती आहे. एक मित्र अडचणीत असेल तर दुसर्‍या मित्राने त्याला नेहमी साथ दिली. त्यामुळे आहेर आणि पगार यांची ‘शोले’ची दोस्ती ही तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात परिचित झाली. यापूर्वी बाजार समितीची निवडणूक असेल किंवा नगरपंचायतीची प्रत्येक वेळी पगार यांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपला मित्र किंवा त्यांच्या घरातील सदस्य निवडूण यावा म्हणून पगार यांनी ही दोस्ती निभावली. विधानसभा निवडणुकीत आपला मित्र उमेदवार नसला तरी त्याचा भाऊ उभा आहे म्हणून अहोरात्र मेहनत घेतली. इतक्या वर्षांची ही मैत्री मविप्र निवडणुकीच्या निमित्ताने तुटली. यापुढे मैत्री वेगळी आणि राजकीय प्रवास वेगळा, अशी भूमिका घेत विजय पगार यांनी आपला मार्ग ‘परिवर्तन’च्या दिशेने वळवला. केदा आहेर कुठल्याही पदासाठी उभे राहिले तरी त्यांच्याविरोधात उभे राहण्याची तयारी पगार यांनी मेळाव्यात बोलून दाखवली. माझ्यावर शंका घेण्यात आली की तू केदा आहेरांच्या विरोधात बोलणार का? पण या मेळाव्याच्या माध्यमातून सांगतो, फक्त बोलणारच नाही तर संधी दिली तर निवडणुकीतही उभा राहिल, असा विश्वास पगार यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे तर मित्रासाठी प्रत्येक वेळी माघार घेतली. पण त्याची इच्छा पूर्णच होत नाही, त्याला 15-20 खासदार मिळाले तर तो राष्ट्रपती पदाची निवडणूकही लढवेल, असा टोलाही पगार यांनी लगावला. यावरुन ‘दोस्त दोस्त ना रहा’ या गाण्याची आठवण सर्वांना झाली.

- Advertisement -

व्याही विरुध्द व्याही

चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे परिवर्तन पॅनलच्या गोटात अचानकपणे सामील झाल्याने येथील निवडणुकीत नवीन वळण मिळाले आहे. सत्ताधारी गटाकडून उत्तम भालेराव हे तयारी करत आहेत. तर डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनीही अर्ज सादर केला आहे. पण सद्यस्थितीला दोन व्याही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील का? याविषयी मतदारांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. दोघेही माजी आमदार असल्यामुळे बोलण्यात ‘खर्‍या अर्थाने’ वाकबगार आहेत. 2012 च्या निवडणुकीत शिरीष कोतवाल यांना सत्ताधारी गटाने संधी दिली. या संधीचे सोने करत त्यांनी अनेक सभाही गाजवल्या. पण नातेसंबंधांमध्ये त्यांच्या उमेदवारीचा पत्ता 2017 मध्ये कापण्यात आला. यंदा कोतवाल की भालेराव अशी चर्चा सुरु होण्यापूर्वीच कोतवाल बाहेर पडले आणि त्यांनी परिवर्तन पॅनलचे व्यासपीठ गाठले. आता तिकडेही डॉ.सयाजी गायकवाड हे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळते की कोतवालांची सरशी होते, हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण दोन्ही व्याही परस्परांच्या विरोधात लढतात की दोन डॉक्टर आमने सामने येतात याकडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष लागून आहे. निवडणुकीत काहीही झाले तरी सद्यस्थितीला व्याही विरुध्द व्याही असा सामना व्यासपीठावर तरी रंगलेला दिसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -