घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र राजकारणात पवारांची ‘पॉवर’ कुणाला?

मविप्र राजकारणात पवारांची ‘पॉवर’ कुणाला?

Subscribe

शुक्रवार, शनिवारच्या भेटीसाठी इच्छुकांनी मागितली रात्रीची वेळ

 नाशिक  मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवार (दि. २९) आणि शनिवारी (दि. ३०) नाशिकमध्ये मुक्कामी येत आहेत. त्यांच्या भेटीसाठी मविप्रतील इच्छुकांनी ‘देव पाण्यात’ ठेवल्याचे समजते. यात सत्ताधारी गटासह विरोधी गटातील मातब्बर इच्छुकांचा समावेश असल्यामुळे पवारांची ‘पॉवर’ नेमकी कुणाला मिळते, यावर संस्थेच्या निवडणुकीचे समीकरण ठरणार आहे.

मविप्र समाज शिक्षण संस्थेची निवडणूक ही जिल्ह्यापर्यंत आणि मर्यादित सभासदांमध्ये असली तरी शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या संस्थेत आहे. सभासदांमध्येही पवारांची ‘पॉवर’ चालत असतेे. त्यांच्या शब्दाला संस्थेच्या निवडणुकीत मोठी किंमत आहे. या पार्श्वभूमीवर ते दोन दिवस नाशिक मुक्कामी आहेत. या दोन दिवसांत संस्थेच्या निवडणुकीत रणनिती अंतिम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुक्कामी असल्यामुळे रात्री उशिरा भेटण्याची संधी मिळावी म्हणून अनेकांनी ‘फिल्डींग’ लावण्याचे काम सुरु केले आहे. कुठल्याही परिस्थितीत आपली ‘गुप्त’ भेट व्हायला हवी म्हणून इतरांमध्ये चर्चा होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, दोन पंचवार्षिकपासून मविप्र नीलिमा पवार व अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होते. दोघांपैकी ज्या पॅनलला पवारांचा बूस्ट मिळतो, ते पॅनल विजयी झाल्याचा इतिहास सर्वजण जाणतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यासाठी इच्छुकांमध्येे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शरद पवारांचा हा दौरा कुठल्या नेत्यांसाठी फायदेशीर ठरतो आणि कुणाला याचा फटका बसतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल.पॅनल निर्मितीच्या दृष्टीने जिल्ह्यातील महत्त्वाच्या सर्व इच्छुकांशी ते सविस्तरपणे चर्चा करतील.

- Advertisement -

काय होऊ शकते?

  • शरद पवार हे त्यांच्या ‘राजकीय’ स्वभावासाठी सर्वश्रूत आहेत. ज्यांना पाठिंबा जाहीर करतील, त्यांना निवडणुकीत मदत करतील, याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही
  • पवारांच्या भेटीत कुठल्या जागेसाठी कोण उमेदवार असेल, याची रणनिती ठरली जाण्याची शक्यता अधिक वाटते दोन्ही
  • पॅनलच्या इच्छुकांशी चर्चा केल्यानंतर निवडणुकीत उमेदवारी अंतिम करण्याच्या दिवसापर्यंत वाट बघू शकतात
  • स्व.विनायकदादा पाटील यांच्या पश्चात पवारांचे विश्वासू म्हणून निवडणुकीत कोण जबाबदारी सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
  • दोन्ही पॅनलच्या इच्छुकांना थेट संदेश देण्यापेक्षा संदिग्धता कायम ठेवून निवडणुकीत धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यताही अधिक आहे.

 

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -