घरमहाराष्ट्रनाशिकतुल्यबळ लढतींत कोण ठरणार बाजीगर

तुल्यबळ लढतींत कोण ठरणार बाजीगर

Subscribe

प्रभाग ३५ ची रचना भौगोलिकदृष्ट्या काहीशी अडचणीची

नाशिक : जुना प्रभाग क्र २७ चा ५० टक्के,२८ चा १० टक्के आणि २९ चा ४० टक्के भाग मिळून तयार झालेल्या प्रभाग ३५ ची रचना भौगोलिकदृष्ट्या काहीशी अडचणीची झाली आहे. प्रभाग रचनेत राजकीय सोयी बघितल्या गेल्या असल्या तरी भविष्यात काम करतांना निवडून आलेल्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे.

कोरोनाकाळात बंद झालेली विकासकामे, महापालिकेसमोरील आर्थिक अडचणी व इतर अनेक बाबींमुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे होऊ शकली नसली तरी नागरी समस्यांचे निराकरण करून मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न विद्यमान नगरसेवकांनी केला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरसेविकांनी राबविलेल्या रुग्णांची विनामूल्य तपासणी व औषधोपचाराची संकल्पना प्रभावी व उपयुक्त ठरली आहे. याशिवाय विनामूल्य पॅथॉलॉजी लॅबचा उपक्रम महापालिका क्षेत्रातील एकमेव उपक्रम ठरला आहे. या प्रभागात भाजप आणि शिवसेना दोन्हीही तुल्यबळ असल्याने आगामी निवडणुकीत दोघांपैकी कोणाला वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. या प्रभागातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका किरण दराडे, भाजपच्या नगरसेविका कावेरी घुगे, राकेश दोंदे, चंद्रकांत खाडे हे प्रतिनिधित्व करीत असले तरी राकेश दोंदे व चंद्रकांत खाडे यांनी प्रभाग रचना गैरसोयीची झाल्याने दुसर्‍या प्रभागात नशीब अजमावण्याचा पर्याय निवडला आहे. या प्रभागात औद्योगिक वसाहतीचा समावेश झाल्याने सर्वाधीक महसूल देणारा हा प्रभाग सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे.

- Advertisement -

प्रशासकीयदृष्ठ्या सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. भाजपकडून विद्यमान नगरसेविका कावेरी घुगे, त्यांचे पती गोविंद घुगे, साहेबराव दातीर, उत्तम काळे, शेखर निकुंभ यांच्यासह अनेक नवे-जुने चेहरे इच्छुकांच्या रांगेत आहेत. तर, शिवसेनेकडील इच्छुकांची संख्या मात्र मोठी आहे. विद्यमान नगरसेविका किरण दराडे यांच्यासह शिवसेनेचे पश्चिम मतदार संघ संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, शरद दातीर, भूषण राणे, रामदास साबळे, संजय भामरे, माजी नगरसेविका शीतल भामरे, मंदाकिनी जाधव, विजय जमदाडे अशी मोठी नामावळी आहे.

प्रभागात भाजप व सेनेची ताकद समसमान असली तरी राजकीय गणितांची गोळाबेरीज करताना महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास आघाडीच्या तीनही पक्षात तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. प्रभागातील इच्छुकांमध्ये विविध पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांचा समावेश असल्याने आगामी निवडणूक रंगतदार आणि तितकीच संघर्षाची होणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे हे पुन्हा निवडणूक लढविण्याची मनीषा बाळगून असले तरी त्यांच्याच कुटुंबातील तरुण चेहरा म्हणून माणिक जायभावे किंवा नंदा जायभावे यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. याशिवाय धोंडीराम आव्हाड हेदेखील काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

शिवसेनेकडून पश्चिम मतदार संघाचे संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत शड्डू ठोकण्याच्या तयारीत असून त्यादृष्टीने त्यांच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. मात्र, आरक्षण बदल आणि आघाडीचा निर्णय झाल्यास मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या प्रभाग ३७ मधून तयारी करत असलेल्या माजी नगरसेविका शीतल भामरे यांच्यासह त्यांचे पती संजय भामरे, भूषण राणे, भूषण देवरे यांचीही नावे स्पर्धेत येण्याची शक्यता वाढली आहेत. त्यामुळे आरक्षण निश्चितीनंतरच शिवसेनेच्या पॅनलची रचना आकार घेण्याची शक्यता आहे. त्यातच माहिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदाकिनी दातीर, त्यांचे पुत्र शरद दातीर यांच्यासह शिवसेनेकडील इच्छुकांच्या नावांचा भलामोठा पट तयार झाला आहे. अर्थात, प्रत्येकाला न्याय देणे शक्य नसल्याने तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची पर्यायी व्यवस्था करणे किंवा त्यांची मनधरणी करून त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, यात शंका नाही.

त्यातुलनेत भाजपचा मार्ग काहीसा सुलभ असला तरी सुखकर नक्कीच नाही. कारण भाजपकडेही परस्पर तुल्यबळ इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिकिटासाठीची पहिली लढाई कोण जिंकतो त्यावर पुढील समीकरणे अवलंबून आहेत. शिवसेना, भाजपबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्षांच्या इच्छुकांनीदेखील आपले अस्तित्व दाखवत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गतवेळच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांची संख्या समान होती. मात्र पुढील निवडणुकीत आणि महापालिकेच्या सभागृहात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेला आपली ताकद वाढवावी लागणार आहे. कामगार वसाहत असल्याने या परिसरात कामगार वर्ग मोठ्या संख्येने प्रभागाचा मतदार आहे. किंबहुना, प्रभागाचे राजकारण किंवा पुढील दिशा ठरविण्याची ताकद येथील कामगार वर्गाच्या हातात असल्याने त्यांचे मतदान निर्णायक ठरते.

अंबड परिसरातील औद्योगिक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या दूर करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, आजतागायत त्यावर फारसे समाधानकारक काम झालेले नाही. किंबहुना या समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे साहेबराव दातीर हे देखील सत्तेत सहभागी होऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे निराकरण करण्याचे उद्दीष्ठ्य डोळ्यांसमोर ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

याशिवाय बाळासाहेब सोनवणे, सुनील जगताप, विशाल डोखे, गायत्री डोखे, प्रशांत खरात, संजीवनी गायकवाड, जनार्दन नागरे, उत्तम काळे, अमोल सोनवणे, रोहिणी जगताप, अ‍ॅड. संगीता पठाडे, अक्षय परदेशी, भालचंद्र दोंदे, अनुसूया दोंदे, हर्षल चव्हाण, बाळासाहेब आठवले, नीलेश केदार, गौरव केदार, सुनील घुगे, वितेश नरवाडे, आतिष पाटील, चंद्रकांत पाटोळे, विशाल पाडबुक, लखन भुजबळ, संजय दातीर, अरूण दातीर, बेबी दातीर, सतीश आसवारे यांच्यासह ५० हून अधिक इच्छुक उमेदवारीची वरमाला आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

असा आहे प्रभाग:-

अंबड औद्योगिक वसाहत, नंदिनी नगर, चुंचाळे घरकुल, हॉटेल गेट वे, गरवारे कंपनी, सिम्बायसेस कॉलेज, उत्तम नगर, मोरवाडी, अश्विननगर

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -