बायकोला पेट्रोलने जाळले अन् पतीचीही आत्महत्या

Murder

कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या अंगावर दारुच्या बाटलीत आणलेले पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, सासरच्या मंडळींचा त्रास आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या भितीने पतीने राहत्या घरी जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१६) नाशिक शहरात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रांजळ निशांत ढेंगळे असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. निशांत लक्ष्मीकांत ढेंगळे (वय ४१, रा. जेलरोड, नाशिक) असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रांजळ ढेंगळे-वेळे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे अंगणवाडी शिक्षिका होत्या. त्यांचे पती निशांत जेलरोड येथे राहत होत्या. नोकरीनिमित्त प्रांजळ ढेंगळे या माहेरी वेळे येथे वडिलांच्या घरी राहत होत्या. त्यांच्या माहेरचे नातेवाईक वेळे गावात दुसरीकडे राहत होत्या. पत्नी माहेरी असल्याने निशांत ढेंगळे आठ दिवसांनी किंवा जसे जमेल तसे तिला भेटण्यासाठी जात होता. त्यांना दोन मुले आहेत. पत्नी माहेरी राहत असल्याने दोघांमध्ये भांडणे सुरु होती. वाद टोकाला गेल्याने दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन मुलांचा ताबा पत्नीकडे दिला होता. पत्नी आणि मुलेही सासरी नसल्याने निशांत ढेंगळे हा ताणतणावात असयाचा.

निशांत ढेंगळे ९ मे रोजी मुलांना भेटण्यासाठी वेळे गावात आला. त्याआधी ते दारुच्या बाटलीत पेट्रोल घेऊन आले होते. ती बाटली त्याने पॅन्टीच्या खिशात ठेवली होती. तो पत्नीच्या घरी आला, त्यावेळी पत्नी दरवाजात बसली होती. कौटुंबिक वादातून पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडणे सुरु झाली. रागाच्या भरात निशांत ढेंगळेने पत्नीच्या डोक्यावर दारुच्या बाटलीतील पेट्रोल टाकले. काही समजण्याच्या आतच निशांतने लायटर पेटवून पत्नीला जाळले. त्यानंतर तो नाशिकला निघून आला होता. ही बाब प्रांजळच्या नातेवाईकांना समजताच तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात निशांत ढेंगळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पत्नीचा मृत्यू झाल्याने निशांत ढेंगळे अधिक ताणतणावत आला होता. पत्नीच्या मृत्यूप्रकरणी सासरची माणसे त्रास देतील आणि पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागणार असल्याच्या भितीने निशांत ढेंगळेने सोमवारी (दि.१६) पहाटे राहत्या घरी जाळून घेत आत्महत्या केली. ही बाब सकाळी उघडकीस आली. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.