मोबाइल चर्जिंग वायरने गळा आवळून पत्नीचा खून

नाशिक : वडाळागाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१५) सकाळी घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पतीस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रिझवान इसाक पठाण (वय ३४, रा. मदिना लॉन्स मागे, तब्बसूम बिल्डिंग, वडाळा गाव) असे संशयीत पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत रिजवान पठाण पत्नी हुमेरा रिजवान पठाण (वय २७) मुलांसह तब्बसूम बिल्डिंग, वडाळा गाव रहावला होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच नशा करून पत्नीशी वारंवार वाद घालून बेदम मारहाण करत होता. रविवारी (दि.१४) मध्यरात्री सुमारे दोन ते पाच वाजेच्या दरम्यान संशयित रिझवान मित्रांसह नशा करून घरी आला. यानंतर पत्नीवर संशय घेत वाद घालून तिला मारहाण केली. भांडण विकोपाला गेल्याने रिझवानने मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सकाळी आई झोपेतून उठत नसल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्यांनी आजीकडे जाऊन आई झोपेतून उठत नसल्याचे सांगितले. आजीने मुलांसह त्यांच्या घरात जाऊन पाहणी केली. तेव्हा हुमेरा मृतावस्थेत होती. शेजार्‍यांसह अन्य नातेवाईकांनीही घटना कळताच धाव घेतली. त्यांच्याकडून पोलिसांनी माहिती घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तत्पूर्वी रविवारी दुपारी संशयताने मुलांनाही मारहाण केल्याचे समजते. तसेच मृत हुमेराला घरातून निघून जा, नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली होती. यानंतर सकाळी तिचा खून झाल्याचे वृत्त मिळाल्याचे नातेवाईक म्हणाले. संशयितासोबत आलेल्या त्याच्या चौघा साथीदारांचाही पोलिसांनी शोध घेत तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.