घरक्राइमपतीचा खून करणार्‍या दुसर्‍या पत्नीला अखेर अटक

पतीचा खून करणार्‍या दुसर्‍या पत्नीला अखेर अटक

Subscribe

नाशिक : जाचाला कंटाळल्याने आणि सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन फरार झालेल्या दुसर्‍या पत्नीस नाशिक शहर पोलिसांनी येवल्यातील मैत्रिणीच्या घरातून सापळा रचून अटक केली. नंदाबाई दिलीप कदम (वय ४०, माळी गल्ली मारुती मंदिर परिसर, वडाळागाव) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. दिलीप रंगनाथ कदम (५५) असे या मृत पतीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वडाळा गावातील माळी गल्ली-कोळीवाडा रस्त्यावर एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी (दि. २४) रात्री ९.३० वाजता घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता घरात पोटात धारदार शस्त्राने वार केलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना प्रथमदर्शनी हा खूनाचा प्रकार असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस तपासात व कुटुंबीयांच्या माहितीनुसार पती-पत्नी मधील वादातूनच ही घटना घडल्याचे पुढे आले होते. कदम यांची दुसरी पत्नी नंदाबाई कदम ही दोन दिवसांपासून फरार असल्याने तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला. तेंव्हापासून पोलीस तिच्या मागावर होते.

- Advertisement -

नंदाबाई कदम ही येवला येथील तिच्या मैत्रिणीच्या घरी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पतीच्या जाचाला ती कंटाळली होती. तिला पतीसोबत राहणे असह्य झाले होते. त्यातून तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक व प्रभारी सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे) आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोपट कारवाळ, राजेंद्र जाधव, पोलीस हवालदार गुलाब सोनार, संजय सानप, चालक अतुल पाटील, महिला पोलीस वैशाली घरटे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -