घरक्राइमजादूटोणे, अंधश्रद्धेसाठी घेतला जातोय वन्यजीवांचा बळी !

जादूटोणे, अंधश्रद्धेसाठी घेतला जातोय वन्यजीवांचा बळी !

Subscribe

वनविभागाकडून शहरासह विविध भागांतील विक्रेत्यांवर करडी नजर; तस्करी रोखण्याचे आव्हान

नाशिक : शहरातील सुखलाल दगडू तेली चांदवडकर या दुकानावर छापा टाकून वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दीपक सुरेश चांदवडकर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची अधिक चौकशी सुरू असून, या दुकानात आढळून आलेल्या वन्यप्राण्यांच्या अवयवांचीही तपासणी केली जात आहे. साळिंदरचे काटे, घोरपडीचे लिंग (हातजोडी), सापाच्या कात, हरणांची शिंग, सांबरशिंग अशा वेगवेगळ्या वस्तू आढळल्याने वन विभागाकडून कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्याशी ‘आपलं महानगर’ने संवाद साधला असता केवळ जादूटोणे, अंधश्रद्धेपोटी हे वन्यप्राण्यांचे अवयव विकण्याचे प्रकार सुरू असून अशा मृत प्राण्यांच्या अवशेषांमधून पैशांचा पाऊस पडत असता, तर वनविभाग सर्वाधिक श्रीमंत असते अशी मिश्किल प्रतिक्रिया देत त्यांनी हे प्रकार थांबणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले.

नाशकात आजवर मांडूळ, बिबट्या, कासव, घोरपड यांसह विविध वन्यप्राण्यांच्या तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या दोन वर्षात झालेल्या कारवायांतून वन्यप्राणी तस्करीच्या चार घटना समोर आल्या आहेत. यातील अनेक प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ठ असून, काही गुन्ह्यांतील तपास सुरू आहे. नाशिकपासून दूर अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडून हे वन्यप्राण्यांचे अवयव शहरात आणले जातात. त्याची विक्री दुकानदारांमार्फत वा गोदातिरी बसणार्‍या विक्रेत्यांमार्फत अव्वाच्या सव्वा दरात केली जाते. नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून, अंधश्रद्धेचा बळी करून ही वन्यप्राण्यांची तस्करी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्या तुलनेत कारवाई कमी संख्येने होत असल्याचेही वास्तव आहे. नाशकात गोदाकाठी, पंचवटी परिसरातील काही दुकानांत, तसेच त्र्यंबक नगरीत गल्लोगल्ली, इगतपुरीतील काही दुकानांत हे अवयव उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. अशा दुकानांवरही यापुढे कारवाई होणार असून, नागरिकांनीही अंधश्रद्धेला बळी न पडता अशा वन्यप्राण्यांचा जीव जाण्यापासून वाचवावा, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी केले आहे.

- Advertisement -

कोणत्या प्राण्यांचा जातो बळी?

जादूटोण्यासाठी प्राण्यांचा बळी घेतला जातो, हे आजवर अनेक घटनांवरून सिद्ध होते. यात धनप्राप्तीसाठी तसेच शत्रूचा नाश करण्यासाठी काही वन्यप्राण्यांचा जीव घेतला जातो. यात साळिंदर, घोरपड, वाघ, कासव, मांडूळ, साप , घोडा, पाल, घुबड, मुंगूस, हरिण-सांबर, बिबट्या यांचा समावेश होतो.

तस्करी रोखण्यातील अडचणी

शहरातील वा अन्य कुठल्याही भागातील दुकानांमध्ये विक्रीसाठी येणारे वन्यप्राण्यांचे अवयव हे दुर्गम आदिवासी पाड्यांवरील बांधवांकडून आणले जात असल्याचे दिसून येते. अशा व्यक्तींकडे ना फोन असतो, ना त्यांचा काही ठोस पत्ता असतो. परिणामी, ते वस्तू घेऊन शहरात दाखल होतात आणि दुकानदारांना कमी पैशात या वस्तू देऊन आपले पैसे घेऊन परततात. मुख्य म्हणजे अनेकदा ते कुठून आले, त्यांचे नाव-गाव काय याचीही कल्पना दुकानदारांना वा शहरातील विक्रेत्यांना नसते. दुकानदारही पैशांच्या हव्यासापोटी कायद्याचे उल्लंघन करून व्यवहार करतात. त्यात वन्यप्राणी वा त्यांचे अवयव घेऊन येणार्‍या व्यक्ती आदिवासी भागातून आल्याने त्यांच्यावर कुणी चटकन संशयही घेत नाही. परिणामी, कारवाई करण्यात अडचणी येतात. मुख्य म्हणजे, तस्करीच्या कारवायांमध्ये शिक्षेसाठी वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. कारवाई करणे आणि त्यातील आरोपींना शिक्षा होणे यात मोठा कालावधी जातो. शिवाय ही कायदेशीर प्रक्रियाही प्रचंड क्लिष्ट आहे.

- Advertisement -

काय आहे शिक्षेची तरतूद ?

वन्यप्राण्यांच्या हत्या, तसेच त्यांचे अवयव बाळगणे, विक्री करणे यासाठी अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद आहे. यात ३ वर्षांपासून ७ वर्षांपर्यंत शिक्षा होते, याशिवाय दंडही होतो. याबाबत वन विभागाकडून सातत्याने वन्यप्राणी संवर्धनासाठी आवाहन केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -