आमदार कांदेंना शह देण्यासाठी भुजबळांना सेनेत घेणार का ?

उलटसुलट चर्चांना उधाण

chhagan bhujbal
छगन भुजबळ

नाशिक : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत असलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा शिवसेनेत घेण्याची चाचपणी सुरु झाली आहे. तर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांच्या विरोधात सक्षम पर्याय देण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांच्या बैठकाही सुरु झाल्यामुळे आपल्याच पक्षाच्या आमदारांविरोधातील नेत्यांना शिवसेनेचे पाठबळ मिळू लागले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याचा विचार सुरु होता. पण पक्षातील काही नेत्यांनी विरोधाची भूमिका घेत ‘सुकलेल्या झाडांना पुन्हा पाणी घालायला लावू नका’ असे पक्ष नेतृत्वाला आवाहन केले आणि भुजबळांची ‘एन्ट्री’ झालीच नाही. अर्थात, पालकमंत्री भुजबळ या प्रस्तावाला फारसे अनुकूल नव्हते. पण येवला व नांदगाव या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी मिळाली असती तर त्यांनी सेना प्रवेशाचा निश्चितच विचार केला असता. पण आमदार कांदे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्री भुजबळांना ‘वेटींग’वर ठेवले. आता आमदार कांदे यांनीच बंडखोरी केल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी शिवसेनेने पर्यायांची चाचपणी आत्तापासूनच सुरु केल्याचे समजते. यात माजी आमदार संजय पवार, मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, नांदगाव बाजार समितीचे सभापती तेज कवडे, नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. या यादीतील संजय पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर आमदार कांदे यांच्याविरोधात सक्षम पर्याय देण्यासाठी भुजबळांना पुन्हा सेनेत घेता येईल का? ज्यामुळे येवल्यासह नांदगावलाही तुल्यबळ उमेदवार मिळेल, या अर्थाने शिवसेनेने आत्तापासूनच सक्षम पर्यायाची चाचपणी सुरु केल्याचे दिसते.

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांना दोन्ही वेळी मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आले. परंतु, त्यांनीही बंडखोर गटाला आपलेसे केल्यामुळे त्यांच्या निष्ठेलाही तडा गेला. अशा परिस्थितीत शिवसेनेला त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची वेळ आली तर मालेगावचे बंडू (काका) बच्छाव यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. ते सध्या कुठल्याही पक्षात नसल्यामुळे शिवसेना त्यांना आपलेसे करुन भुसेंविरोधात लढण्यासाठी बळ देऊ शकते. येथे अजून किती इच्छुक उमेदवार आहेत, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार मतदारसंघात येण्यापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: तालुकानिहाय बैठका घेण्याचे आदेश स्थानिक शिवसैनिकांना दिले आहेत. त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्याच्या बैठका पार पडत असून, मुख्यमंत्री स्वत: येथील नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी फोनवर बोलत असल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह अधिक वाढत असल्याचे चित्र सध्या दिसते.