घरमहाराष्ट्रनाशिकविधानसभा निवडणूकांतही इंजिन खडखडाटाविनाच?

विधानसभा निवडणूकांतही इंजिन खडखडाटाविनाच?

Subscribe

दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीची लगबग सुरू झाली असताना नाशकातील ‘राजगडा’वर मात्र सामसूम दिसून येतेय. लोकसभा निवडणूकीत जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची छाती न करता काँग्रेस आघाडीचे वकीलपत्र घेणारा मनसे पक्ष विधानसभेच्या रणातही त्याच भूमिकेत राहणार असल्याचे आताच्या हालचालीवरून स्पष्ट होताना दिसतेय.

२००९ पासून पुढील पाच वर्षे सुगीचा काळ अनुभवलेला मनसे त्यानंतर मात्र नाशिककरांच्या मनातून उतरला. अल्पावधीत मिळवलेले यश या पक्षाला पचवता आले नाही. राजकारणातील धरसोड वृत्ती अंगाशी यायला वेळ लागत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीची लगबग सुरू झाली असताना नाशकातील ‘राजगडा’वर मात्र सामसूम दिसून येतेय. लोकसभा निवडणूकीत जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची छाती न करता काँग्रेस आघाडीचे वकीलपत्र घेणारा मनसे पक्ष विधानसभेच्या रणातही त्याच भूमिकेत राहणार असल्याचे आताच्या हालचालीवरून स्पष्ट होताना दिसतेय

आगामी विधानसभा निवडणूक दोन तृतीयांश बहुमताने जिंकायची या उन्मादात सत्ताधारी भाजपशिवसेनेची आकडेमोड तर येनकेन प्रकारे पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्राण ओतण्याचे काम विरोधी काँग्रेस आघाडीमध्ये सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात ‘ईव्हीएम’चा गोंगाट वगळता शांतता आहे. दोन महिन्यांवर विवाह सोहळा येऊन ठेपलाय आणि वधूपित्याकडे तयारीचे गांभीर्य नाही, अशी अवस्था सर्वेसर्वा राज ठाकरे यांची दिसून येतेय. मुंबई पाठोपाठ बालेकिल्ला असलेल्या नाशिकबाबत राज नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण महापालिका हरल्यावर लोकसभा निवडणूकीच्या रणात उतरण्याऐवजी ‘बाय’ दिलेल्या आणि केवळ सभांमधून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढण्यात धन्यता मानल्याने राज यांना ‘मनसे’ राजकारणात रस राहिला की नाही, असा प्रश्न नाशिकवासियांना न पडल्यास नवलच. कधीकाळी किमान नाशिक शहरात वरचष्मा राहिलेल्या मनसेला आता तितकेसे अनुकूल वातावरण नसले तरी तीनही मतदारसंघात उमेदवार देऊन उपद्रवमूल्य सिध्द करता येणे शक्य आहे.

- Advertisement -

शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे यांच्या वक्तृत्वकला व संघटन कौशल्याची नाशिककरांना भुरळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे भाषणे देणारा, विरोधकांची शाब्दिक अर्थाने सालपटे काढणारा, उपहासात्मक शब्दफेकीने सभा जिंकणारा नेता म्हणून राज यांना इथे नेहमीच पसंती मिळाली. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने ‘बंडोबा’ ठरवूनही स्थानिक सैनिक त्यांच्यामागे सावलीप्रमाणे उभे राहिले. राजकारणाशी देणेघेणे नसलेल्या नाशिककरांनाही राज यांच्या नेतृत्वात ‘दम है’ असल्यासारखे आणि ‘करून दाखवतील’ असा विश्वास वाटला. म्हणूनच २००९ च्या विधानसभा निवडणूकांत मनसेने नाशिक शहरातील तीनही विधानसभा क्षेत्रात दैदिप्यमान विजयाची नोंद करीत इतिहास घडवला होता. त्यानंतर लगेचच जागांची चाळीशी गाठत महापालिकेत सत्ता आणण्याची कमाल राज यांनी करवून दाखवली होती. तथापि, काहीतरी गणित चुकले. नाशिककरांना अपेक्षित दान पदरात पडले नाही. मनसेच्या स्थानिक म्होरक्यांचा कारभार जनतेच्या इच्छाआकाक्षांना छेद देत गेला. राज यांची बहुचर्चित ‘ब्लू प्रिंट’ कधीच डोळ्यात साठवता आली नाही. दिलेली वचने पूर्ण करण्यात मनसेला साफ अपयश आल्याने हा पक्ष नाशिककरांच्या मनातून उतरला. त्याचा फटका लोकसभेपासून ते महापालिका निवडणूकांपर्यंत बसून मनसे नाशिकमधून हद्दपार झाली. आता केवळ अस्तित्वापुरते पाच नगरसेवक आणि निवडक शिलेदार राज यांच्या खांद्याला खांदा लावताना दिसून येताहेत. गेल्या लोकसभा निवडणूकीरिाज यांनी नाशकात उमेदवार देण्याचे टाळले ते परिस्थितीचा अंदाज घेऊनच.

पक्षाची गलितगात्र स्थिती बघता नाशिकमध्ये मनसेचे उमेदवार आमदारकीसाठी नशीब अजमावणार काय, हा प्रश्न आहे. पक्षाचे संघटन, जनाधार, कार्यकर्त्यांचे मोहोळ हे सारे बासनात गुंडाळले गेल्याने पक्षाकडे नाशिक पूर्व मतदारसंघातील राहुल ढिकले वगळता इतर ठिकाणी उमेदवार तरी आहेत की नाही अशी शंका आहे. राहुल यांच्याकडे पक्षाचे उपाध्यक्षपद आहे. तथापि, ढिकले घराण्याचे सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रांतील योगदान सर्वश्रुत असल्याने राहुल यांना वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज पडणार नाही. त्यांच्या आत्मविश्वासामुळेच गेल्या तीन वर्षांपासून ते निवडणूक तयारीत व्यस्त आहेत. राहुल यांच्या उमेदवारीची सत्ताधाऱ्यांनाही धडकी बसली असल्याचे बोलले जातेय. तथापि, नाशिक मध्य आणि पश्चिम विधानसभा क्षेत्रांमधून लढण्यास फार कोणी उत्सुक नसल्याचे बोलले जाते. गेल्या काही वर्षांत मनसेची लाट ओसरून तिथे भाजप जनाधाराच्या लाटेवर स्वार आहे. मनसेचा सुगीचा काळ पुन्हा येईल की नाही, हा संशोधनाचा भाग असला तरी पक्षाच्या पिछेहाटीला नेतृत्व आणि जनतेला गृहीत धरण्याचा प्रमाद या दोन प्रमुख बाबी कारणीभूत आहेत. पक्षाला वसंत गीते, उत्तमराव ढिकले, नितीन भोसले यांसारखे चळवळीतील, तर डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक यांसारखे स्वच्छ चेहरे लाभले होते. या मंडळींनी जीवाचे रान करून पक्षाला अनपेक्षित अभ्युदयप्राप्ती करून दिली होती. त्यांच्या प्रयत्नांना राज यांच्या जादुई नेतृत्वाचा परिसस्पर्श लाभल्याने पक्षाला सत्तेची कवाडेही उघडता आली. मात्र, राजकारणात एकखांबी तंबू फायदा कमी तर नुकसान अधिक करणारा ठरतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनसे पक्ष होय. राज यांची झटपट व ‘दे धक्का’ निर्णय घेण्याची शैली पक्षातील प्रमुख शिलेदारांना रूचत नव्हती. सत्तेसाठी आधी भाजप, तर नंतर ज्यांना अडीच वर्षे शेलक्या विशेषणांनी घाव घातले, त्या छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत दोस्ताना करण्याचा त्यांचा निर्णय नाशिककरांना आचंबित करणारा ठरला. विकासकामे न होण्याचा ठपका राज्य सरकारवर ठेवण्यात राज यांनी पाच वर्षे वाया घालवली. सत्तेतील पाच वर्षांच्या काळात अनेकदा नाशकात आलेल्या राज यांची बहुचर्चित ‘ब्लू प्रिंट’ नाशिककरांसाठी केवळ मृगजळ ठरले. पाच वर्षांच्या काळात राज यांनी नाशिककरांची जशी नाराजी ओढवून घेतली, तेवढ्याच द्रुतगतीने पक्षातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मने गढूळ झाली. वसंत गीते, अतुल चांडक, सचिन ठाकरे यांसारखे मोहरे पक्षातून गळाले. पैकी गीते यांचे पक्षाबाहेर जाणे निर्णायक ठरले. अनेकांनी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांमध्ये आसरा घेतला. मनसे खिळखिळी होत गेली. पालिकेत केवळ पाच जागी पक्षाचे नगरसेवक निवडून आले असले तरी त्यांचा विजय पक्षापेक्षा स्वकर्तृत्वाचा मानला जातो.

- Advertisement -

राजकारणात कधी डोक्यावर घेणारी जनता कार्यालेख घसरला की पायाखाली घेण्यासही कचरत नाही. ज्या सत्तापदांवर राजकारण्यांना विसावण्याची संधी मिळते, त्याचे श्रेय जनताजनादर्नाचे असते, याचे भान न राखणाऱ्यांचे राजकारण अळवावरील पाण्याप्रमाणे असते. उद्याऐवजी आजच्यापुरता विचार करण्याची बुध्दी क्षणिक सुखाची झुळूक देणारी ठरत असली तरी त्यामध्ये भविष्यातील चिरकाल दडलेला नसतो. मनसेचे तेच झाले. अल्पावधीत अनपेक्षित यश मिळाल्याने स्थानिक नेते जमिनीवर राहिले नव्हते. पक्षात येणाऱ्यांना नैतिकतेची चाळणी न लावल्याने सत्तालोलूपांनी पक्ष सडला आणि व्हायची तीच परिणती झाली. सत्तेला ओहोटी लागताच ही मंडळी पक्षाला ‘बाय’ करीत इतरत्र सोय लावण्यास निघून गेली. मनसेची नाशकात अशी काही पिछेहाट झालीय की आता पक्षाची पुनर्उभारणी दुष्प्राप्य वाटते आहे. बरं, एवढे होऊनही पक्षनेतृत्वाला त्याचे गम्य नाही. अवघे संघटन विस्कळीत झाल्यावरचा उतारा काय, यावर कोणी चर्चाही करायला तयार नाही. स्थानिक पातळीवर मतभेद असले तरी राज यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांना पुनर्वैभव प्राप्तीचे वेध लागत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मग दहा वर्षांपूर्वी नाशकात कानोकोपरा व्यापलेला पक्ष तो हाच का, अशी विचारणा करण्याची वेळ आज आलीय. सारांशात, गेल्या लोकसभा निवडणूकीत जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची छाती न करता काँग्रेस आघाडीचे वकीलपत्र घेणारा मनसे पक्ष विधानसभेच्या रणातही त्याच भूमिकेत राहणार असल्याचे आताच्या हालचालीवरून स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -