व्हिडीओ व्हायरलची धमकी देत अंधाचे ‘ब्लॅकमेलिंग’

नाशिकमधील एका अंध सामाजिक कार्यकर्त्याशी एका महिलेने जवळीक साधली आणि तिच्या तीन साथीदारांनी शूटिंग केले. ही क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी त्यांच्याकडे २ लाखांची खंडणी मागितली.

प्रातिनिधीक फोटो

नाशिकमधील एका अंध सामाजिक कार्यकर्त्याशी एका महिलेने जवळीक साधली आणि तिच्या तीन साथीदारांनी शूटिंग केले. ही क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत चौघांनी त्यांच्याकडे २ लाखांची खंडणी मागितली. तसेच, मारहाण करत एटीएममधून १० हजार काढून घेतले. ही घटना गुरुवारी (ता. ४) शालिमार परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेफाली शर्मा, कय्यूम पटेल, दानिश शेख, सोमनाथ क्षत्रिय (सर्व रा. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अरुण मुरलीधर भारस्कर असे फसवणूक झालेल्या अंध सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. ते द ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष आहेत. संध्या राजपूत या महिलेने भारस्कर यांना शेफाली शर्मा नावाच्या मैत्रिणीस पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी ऑफिसमध्ये शेफाली शर्मा यांना ४ हजार रुपये दिले. यानंतर रविवारी (ता. ७) शेफाली हिने फोन करत ऑफिसमध्ये प्रायव्हसी आहे का, अशी विचारणा केली. मात्र भारस्कर यांनी अहमदनगरला जात असल्याचे सांगितले. त्यावर शेफाली यांनी कारने जाण्याचा पर्याय दिला. मात्र, भारस्कर हे बसने अहमदनगरला गेले. तेथे गेल्यावरही तिने वारंवार फोन केले. रात्री ९ वाजेदरम्यान ते शालिमार येथील ऑफिसमध्ये आले असता शेफालीने त्यांच्या कार्यालयात येत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत कय्यूम पटेल, दानिश शेख, सोमनाथ क्षत्रिय हे तिघेही होते. तिघांनी शेफाली व भारस्कर यांची नकळत शूटिंग केली. यानंतर पत्रकार असल्याचे सांगत तुम्हा दोघांचे शूटिंग केल्याचे सांगत, आम्हाला २ लाख रुपये द्या अन्यथा तुमचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली. त्यावरुन चौघांनीही भारस्कर यांना ब्लॅकमेल करत मारहाण केली. त्यानंतर भारस्कर यांना शालिमार येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये नेले व एटीएमचा पिनकोड विचारत १० हजार काढले. त्यानंतर शेफाली व कय्यूम पटेल यांनी आणखी तीन एटीएमध्ये भारस्कर यांना नेत पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघाले नाहीत. आयडीबीआयच्या एटीएममधून बाहेर येत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर भारस्कर यांनी भद्रकाली पोलिसांत तक्रार दिली.