भाजीपालामार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन दुचाकीला चावी ठेवून जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. दुचाकीला चावी दिसताच आणि दुचाकीजवळ कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.५) आकाशवाणी भाजीमार्केटजवळ, पिठाची गिरणीसमोरील रोडवर, नाशिक येथे घडली. याप्रकरणी जयप्रकाश काशीनाथ पवार यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जयप्रकाश पवार यांची पत्नी सुचेता पवार भाजीपाला खरेदीसाठी अॅक्टिव्हा (एमएच १५-डीबी ६४३३)वरुन आकाशवाणी भाजीमार्केटमध्ये आल्या. त्या भाजीपाला खरेदी करत असताना अॅक्टिव्हाची चावी काढून घेण्यास विसरल्या. अॅक्टिव्हाजवळ कोणीही नसल्याचे व गाडीलाच चावी असल्याचे दिसताच चोरट्याने ती लंपास केली. थोड्यावेळाने सुचेता पवार अॅक्टिव्हा पार्क केल्या त्या ठिकाणी आल्या असता त्यांना अॅक्टिव्हा दिसली नाही. त्यांनी गाडीचा शोध घेतला. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. दरम्यान, चावी गाडीलाच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातून अनोळखी व्यक्तीनेच अॅक्टिव्हा पळवून नेल्याची खात्री झाली. पुढील तपास पोलीस नाईक महाले करत आहेत.