काम धडाकेबाज; तरीही ४ महिन्यांत आयुक्त पवारांचा राजकीय बळी

‘मातोश्री’शी सलगी भोवली; आता अन्य अधिकारी शिंदे सरकारच्या रडारवर


नाशिक : ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या बड्या अधिकर्‍यांच्या बदल्यांना शिंदे सरकारने ब्रेक लावण्याचा धडका सुरु ठेवताना नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांचीही अवघ्या चार महिन्यांत उचलबांगडी केली आहे. रमेश पवार यांनी नाशिकमध्ये धडाकेबाज कामगिरी सुरु केली असतानाच केवळ उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याशी असलेली सलगी त्यांना भोवली. यापुढील काळातही महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे नियोजन शिंदे सरकारने केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

सरकार बदलल्यावर अधिकार्‍यांच्या बदल्या होणे ही बाब नवीन नसली, तरी एकनाथ शिंदे यांचा निर्णयाचा धडाका बघता महाविकास आघाडीची डोकेदुखी यामुळे वाढत आहे. शिंदे यांनी नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या बड्या अधिकार्‍यांच्या बदल्यांना रोखण्यात येणार आहे. यात आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये आस्तिक पांडे, दीपा मुधोळ-मुंडे, अभिजित चौधरी यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. या बदल्या ठाकरे सरकारकडून २ंं९ जूनला करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची औरंगाबाद सिडकोत करण्यात आली होती. सांगली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची बदली औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून केली होती. तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे यांची केलेली नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीव्दारे स्थगित केली. त्यानंतर आता ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचा धडाका सुरु करण्यात आला आहे.

ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय या अधिकार्‍यांची झाली बदली

आदित्य यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुंबई महापालिकेचे दादर जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची भायखळा ई विभागात बदली करण्यात आली आहे. यासह अंधेरी के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची दादर जी-उत्तर विभागात, तर भायखळा ई विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांची अंधेरी के-पूर्व विभागात बदली करण्यात आली आहे. त्यानंतर आता आदित्य यांचे निकटवर्तीय नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.

कामांसाठी झपाटलेले अन् ‘नॉन करप्ट’ आयुक्त !

केवळ महापालिकेचे आयुक्तच नाही तर प्रशासकीय राजवटीचा मुखिया म्हणून कार्यरत असलेले रमेश पवार यांची अवघ्या चार महिन्यांची कारकिर्द नाशिककरांना कायमस्वरुपी लक्षात राहिल अशीच आहे. ‘नॉन करप्ट’ अधिकारी म्हणून त्यांचा असलेला लौकीक अपवादात्मक अधिकार्‍यांनाच कमवता आला आहे. वास्तविक, महापालिकेत प्रशासक म्हणून काम करताना त्यांना कोट्यवधींची कामे ‘वाजवता’ आली असती. परंतु परिस्थितीचा वा पदाचा गैरवापर न करता त्यांनी नाशिकमधील मुलभूत कामांवर भर दिला.

आयुक्त रमेश पवार यांची ठळक कामे

 • नाशिकमध्ये रुजू होताच त्यांनी रिक्षात बसून गोदाघाट गाठले आणि घेतला वस्तूस्थितीचा घेतला आढावा
 • धोबी घाट बंद करतानाच नदी प्रदूषण करणार्‍या घटकांवर तातडीने आळा घातला
 • चार वर्षांपासून बंद असलेले फाळके स्मारक पुन्हा सुरु केले
 • नमामि गोदा प्रकल्पांत सल्लागार संस्था नेमण्यासाठी पुढाकार
 • भूसंपादन प्रकरणातील अफरातफरी शोधण्यासाठी घेतला पुढाकार
 • विविध प्रकल्पांना भेट देऊन रखडलेल्या कामांना वेग
  बंद प्रकल्प सुरु करण्यासाठी हालचाली
 • महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश मिळावेत म्हणून कापडाची प्रयोगशाळेतून तपासणी करण्याचे दिले आदेश
 • पहिल्याच पावसात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांची स्वत: फिरुन पाहणी केली व तातडीने खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले
 • महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर आणि मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकतींचा निपटारा
 • उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यासाठी मोकळ्या भूखंडांचा पुनर्विकास नियोजन
 • स्पील ओहर कमी करण्याचे प्रयत्न
 • गंगापूरोडवरील दोन मोक्याचे भूखंडांच्या
  खासगीकरणावर फुली
 • मायको सर्कलच्या प्रस्तावित उड्डाणपुलाला ब्रेक
 • स्ट्रक्चरल ऑडीटसाठी जुन्या इमारतींचे सर्वेक्षण
 • १ जुलैपासून बांधकाम परवानग्या पुर्णपणे ऑनलाईन करण्याचा नगररचना विभागाला
  दिला आदेश
 • वाहतूक बेटाचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी नियमावली
 • शहरातील १३५ वाहतूक बेटांच्या विकासासाठी प्रयत्न
 • सीटी लिंक बसमधील प्रवाशांकडून कमी पैसे घेवून तिकिट न देणार्‍या कंडक्टरला दंडाबरोबरच थेट तुरूंगाची हवा खाण्यासाठी पाठवण्याचा घेतला निर्णय
 • सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम ऑगस्टमध्ये देण्याचे केले नियोजन