साहित्य संमेलनस्थळी स्वरगंधात उमटली अक्षरांचे रंग

सुलेखनाच्या शैली, कुंचल्यांची मराठी रसिकांना भुरळ

सुप्रसिध्द गायिका मेघना देसाई यांच्या स्वरांवर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी अक्षरांच्या रंगांची उधळण केली. अंगावर शहारे आणणाऱ्या सावरकरांच्या ने मजसिने परत मातृभूमीला या गीतरचनेवर पालव यांनी कॅनव्हासवर सुलेखनाच्या विविध शैली आपल्या कुंचल्यातून सादर केल्या. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

कुसुमाग्रज नगरीत होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता  मध्यवर्ती हिरवळीवर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचा “ऐसी अक्षरे “हा सुलेखनावर आधारित प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. अच्युत पालव यांनी संत ज्ञानेश्वर, संत रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या काही निवडक शब्द रचना घेऊन कॅनव्हासवर सुलेखनाच्या विविध शैली आपल्या कुंचल्यातून सादर केल्या. हे चालू असताना प्रसिद्ध गायिका मेघना देसाई यांनी गायन केले.

सातत्याने मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन सुलेखनात नवनवीन प्रयोग करणाऱ्या पालवांनी साहित्य संमेलनात तुकारामांच्या आनंदाचे डोही आंनद तरंग या ओवीचा वापर करून अक्षररचना केली. माणसाचे रोजचे जगणे स्पर्शाशी निगडीत आहे पण स्पर्शाची जादू तंत्रज्ञानाला कळत नाही. भावनांचा ओलावा, स्पर्शातलं मर्म, बोटांतून जिवंतपणे झरणारी उत्स्फूर्तता तंत्रज्ञानात येणार नाही, हे पालव यांनी सुलेखन करत उपस्थितांना दाखवून दिले. ६ बाय ४ फुटाचे चार कॅनव्हासवर अच्युत पालव यांनी विविध अक्षररचना साकारल्या. गायन आणि सुलेखन अशी वेगळी मेजवानी साहित्यप्रेमींना ऐकायला आणि पाहायला मिळाली.

लिहिणे म्हणजे एक संस्कृती आहे. हा सांस्कृतिक ठेवा आपण जपायला हवा. तो जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी हाताच्या बोटांना शाई लागायला हवी. शाई आणि बोरूचा संवाद व्हायला हवा. अक्षरांचं बोलना ऐकायला हवे, असे पालव यांनी उपस्थितांना सांगितले.