घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमखमलाबाद गावात आज नागोबाची यात्रा

मखमलाबाद गावात आज नागोबाची यात्रा

Subscribe

नाशिक : नागपंचमीनिमित्त मंगळवारी (दि.२) शेकडो वर्षांची परंपरा असलेली व मखमलाबादसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या नवसाला पावणार्‍या नागोबा देवतेची यात्रा भरणार आहे. तवली डोंगराच्या अमृत उद्यानात या यात्रेनिमित्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी भाविकांसाठी विविध दुकाने थाटली आहेत.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष कारभारी काकड यांच्या अध्यक्षतेत श्रीराम मंदिराच्या सभागृहात बैठक झाली. त्यात यात्रेचे नियोजन करण्यात आले. महानगरपालिकेकडून तवली डोंगराचा विकास पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. यात्रेचा खर्च ग्रामविकास मंडळातर्फे गावातील मूळ ग्रामस्थांकडून वर्गणी जमा करून भागवला जातो. गावातील ग्रामस्थांकडून प्रहराप्रमाणे वर्गणी जमा केली जाते. परिसर व यात्रोत्सव सप्ताह इ.चा खर्च वाढल्याने यंदा १५० रुपये वर्गणी करण्यात आली. ही वर्गणी ग्रामविकास मंडळातील प्रहराप्रमाणे नेमण्यात आलेल्या सदस्यांकडून जमा केलीजाते. पूर्वी तवलीच्या टेकडीवर एक नागोबाचा चिरा होता. परंतु, आज याठिकाणी एक नागोबा-नागदेवी चिर्‍याचे भव्य मंदिर उभे आहे. या टेकडीचा विकास आता केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून करण्यात आला आहे. सुमारे ११ हजार विविध प्रजातींची झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे हे ठिकाण एक निसर्गरम्य स्थळ झाले आहे. आता याठिकाणी अमृत उद्यानाची निर्मिती केल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. यात्रेमुळे नाशिक शहर आणि परिसरातील लाखो भाविक याठिकाणी हजेरी लावतात. यंदा भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेच्या दिवशी लाखो रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते. यात्रेनिमित्त मंदिराला दरवर्षी रंगरंगोटी केली जाते.

- Advertisement -

या नागोबा मंदिरातील चिर्‍याला एक इतिहास असल्याने मखमलाबाद परिसरातील ग्रामस्थासह पंचक्रोशीतील भाविकही आवर्जून हजेरी लावतात. याठिकाणी मंदिरात नवस करून काहीजण नवसाची पूर्ती करतात. यात्रेच्या दिवशी सकाळी ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी मंदिरात जाऊन पूजाविधी करून मंदिराबाहेर नवीन ध्वजाची उभारणी करतात. यात्रोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी अध्यक्ष कारभारी काकड उपाध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे सचिव मिलिंद मानकर, पंडीत पिंगळे, गंगाधर खोडे, आबा मुरकुटे, रमेश काकड, संतु काकड, बाबुराव रायकर, भास्कर थोरात, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, माजी उपमहापौर भिकुबाई बागूल, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक दामोदर मानकर, माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे, सुरेश काकड, नारायण काकड, मदन पिंगळे,
रमेश पिंगळे, गोकुळ काकड, देविदास घाडगे, अनिल काकड, प्रमोद पालवे यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

दुपारी कुस्त्यांची दंगल

मखमलाबाद येथे नागपंचमी यात्रेनिमित्त गावाजवळ दुपारी कुस्त्यांची दंगल भरणार आहे. यासाठी नाशिक शहरासह जिल्हा भरातून पहिलवान हजेरी लावतील. कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी पंचक्रोशीतील हौशी प्रेक्षक हजेरी लावतात. यासाठी भव्य रिंगण तयार करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -