कांद्याला बेमोसमीनं लावला हळदीचा रंग !

बळीराजा चिंतातूर; सोशल मीडियावर ‘हळद लागली’ गाणं व्हायरल

ममदापुर: येवला तालुक्यात सर्वत्र ढगाळ हवामान, अवकाळी, वाढलेला गारवा, दिवस-रात्र धुके व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांनी थैमान घातल्याने येवला तालुक्यातील हजारो हेक्टरवरील कांदा पीक धोक्यात आले आहे. दरम्यान, कांदा पिवळा पडून लागल्याने बळीराजा चिंतातूर झाला असून, सोशल मीडियावर मात्र ‘हळद लागली’ हे गाणं व्हायरल होतय.

पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असून, उत्पादन खर्चात वाढ अन् उत्पादनात घट येत असताना अशातच बाजारभावाची चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली आहे. काढणीला आलेला पोळ कांदा गार पाण्यामुळे कांदा जमिनीतच सडत आहे. कांदा भुईतच राहून हातात नुसती कांद्याची पाथ येत आहे. येवला तालुक्यात नकदी पीक म्हणून कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी हजारो एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या पोळ कांद्याला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

या संकटातून सावरत काही शेतकर्‍यांनी उशिराने कांदा रोपे टाकली, रोपांनीही हळदीचा रंग परिधान केला आहे. शेतकर्‍यांनी उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात रोप विकत घेऊन हजारो हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड केली. यासाठी एकरी सुमारे लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, सातत्याने दाट, धुके व दवबिंदू पडत आहे. अवकाळी पाऊस, तर कधी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिकाला जणू हळद लागली आहे.