Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक 'योगा' निरोगी आरोग्यासह उज्ज्वल करिअरचा मार्ग

‘योगा’ निरोगी आरोग्यासह उज्ज्वल करिअरचा मार्ग

राष्ट्रीय खेळाडू तथा योग तज्ज्ञ चंचल माळी करतेय ‘एमपीएससी’ची तयारी

Related Story

- Advertisement -

निरोगी आरोग्याचा मूलमंत्र देणारे योगशास्त्र आता करिअरसाठी देखील अत्यंत उत्तम पर्याय ठरत असल्याचे पुढे आले आहे. नाशिकमधील राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू तथा योग तज्ज्ञ चंचल सूर्यकांत माळी ही योग प्रशिक्षक म्हणून करिअर करण्याच्या वाटेवर असून, खेळाडू कोट्यातून तीने ‘एमपीएससी’चा मार्गही निवडला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बोलताना चंचल माळी म्हणाली की, खेळापर्यंत मर्यादित असलेला योगा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. इयत्ता सहावीत असल्यापासून मी योगा करते. गेल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत 6 वेळा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यात 2018 मध्ये दिल्लीतील कुरुक्षेत्र येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 4 वेळा राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केले. केवळ स्पर्धांपर्यंत मर्यादित न राहता 2018 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून योग टिचर डिप्लोमा केला. तसेच डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड हर्बेलिझम हा डिप्लोमा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केला. आता योग प्रशिक्षक म्हणून करिअरच्या वाट्या खूल्या झाल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणार्‍या खेळाडूंना स्पोर्ट कोट्यातून ‘एमपीएससी’ देता येते. त्यासाठी आता तयारी करत असल्याचे, चंचल सांगते.

- Advertisement -

योगाचे स्वरुप आता पूर्णत: बदलले आहे. फिटनेस योगा, रिदमिक योगासोबतच जीममध्येही योगा शिकवला जातो. इतकेच नव्हे तर भारतातील योग प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. मलेशिया सारख्या देशांमध्ये योगाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामुळे योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केंद्र सरकारने प्रोत्साहन दिल्यामुळे योगाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. अनेक विद्यापीठांनी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘योगा’योग अजून चुळून आलेला नसला तरी मुक्त विद्यापीठ, नागपूर विद्यापीठांनी हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यामुळे फक्त ‘फिटनेस’साठी नव्हे तर विद्यार्थ्यांनी योगाकडे करिअरचे ऑप्शन म्हणून बघितले पाहिजे, असेही ती सांगते. 13 वर्षांच्या योगाच्या करिअरमध्ये यशवंत व्यायाम शाळा व यशवंत जाधव सर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे चंचल आवर्जून सांगते.

योगा टिप्स

  • वयाच्या 8 व्या वर्षापासून योगा सुरु करावा
  • बारावीनंतर योगाचा पदवी अभ्यासक्रम
  • पदव्यत्तर पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध
  • मुक्त विद्यापीठात पदविका अभ्यासक्रम
  • केंद्र सरकारच्या आयुष विभागातर्फे योगाच्या परीक्षा घेतल्या जातात
  • यानंतर योग प्रशिक्षक म्हणून करिअर
  • ‘साई’ संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक होण्यास मान्यता
  • डॉक्टर, अभियांत्रिकी या शाखांप्रमाणेच
    योगा हादेखील करिअरचा प्रशस्त मार्ग
- Advertisement -