नाशिक : तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का घेतो,असे म्हणत मोठ्या साडूने मद्यधुंद अवस्थेत साथीदारांच्या मदतीने लहान साडूचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १४) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथे घडली. हल्लेखोर मोठा साडू हा सराईत गुन्हेगार असून, तो फरार झाला आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत उत्तम शिंदे (वय २९, रा. टिटवाळा, जि. ठाणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. साडू संदीप शांताराम निकाळे (रा. बदलापूूर जि. ठाणे) असे फरार साडूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत नातेवाईकाच्या लग्नासाठी इगतपुरीतील रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. तो लग्नसोहळा आटोपून पुन्हा टिटवाळा येथे जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याचा मोठा साडू संदीप निकाळ याने अनिकेतजवळ आला. तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का घेतो,असे म्हणत त्याने अनिकेतशी वाद घातला. त्याने मद्यधुंद अवस्थेत रविवारी मध्यरात्री सोबत आलेल्या विशाल शांताराम निकाळे (रा. बदलापूर), सागर सोनवणे (रा. गोंदेदुमाला), अमोल पवार (रा. कुर्हेगाव ता. इगतपुरी) यांना बोलवून घेतले. त्यावेळी त्याने साडू अनिकेतचा खून करायचे आहे, असे तिघांना सांगितले. त्यानुसार संशयितांनी अनिकेतला मोबाईल कॉल करून घोटी सिन्नर फाटा परिसरात बोलावून घेतले.
सुरूवातीला सासरची बाजू का घेतो, माझी बाजू का घेत नाही असे म्हणत मोठा साडू संदीप निकाळे याच्या संशयितांनी त्यास लाकडी दांडे, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो बेशुद्ध अवस्थेत दिसताच सर्वांनी त्याला रोडच्या बाजूला टाकून काढला. ही बाब नातेवाईकांना समजताच त्याचे मेहुणे गणेश जगताप व सहकार्यांनी अनिकेतला उपचारार्थ घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मयत घोषित केले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी रुग्णल्यात गर्दी करत हंबरडा फोडला. याप्रकरणी गणेश देवीदास जगताप (रा. वसंतपवार नगर, इगतपुरी) यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत आहे.