पुराच्या पाण्यात पोहण्याची स्टंटबाजी करण्याचे धाडस अनेक तरुण करत असतात. प्रशासनाने नदीकाठी गर्दी करू नये, असा इशारा दिला असतांनाही काही तरुण अतिधाडस करत रामकुंडावर पुराच्या पाण्यात पोहतांना दिसून आले. याच दरम्यान एक युवक पुरात उडी मारून स्टंटबाजी करत असतांना वाहून गेला. नदीकाठच्या जीवरक्षकांच्या हा प्रकार लक्षात येताच जीवरक्षकांच्या मदतीने या युवकाला वाचविण्यात यश आले.
नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे गोदावरीचा जलस्तर वाढला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करताच रामकुंडावर पोहण्यासाठी अनेक युवक गर्दी करतात. याठिकाणी काही तरुण वस्त्रांतरगृहाच्या इमारतीवरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी करतांना दिसून आले. प्रशासनाकडूनही याकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून आले.अशाच प्रकारे काही तरुण उंचावरून उडी मारून पुराच्या पाण्यात पोहत असतांना एक युवक वाहू लागला. ही बाब जीवरक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला वाचवण्यात आले.