बेकायदा पिस्तोल बाळगणार्‍या युवकास अटक

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

देशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीररित्या बाळगणार्‍या युवकास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पिस्तोल व काडतूस जप्त केले आहे. विशाल नारायण नांद्रेकर (वय ३५, रा.दिपालीनगर, मुंबई नाका, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मुंबई नाका हद्दीतील दिपालीनगर येथील एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्टल बाळगत असल्याची माहिती नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक प्रवीण वाघमारे यांना मिळाली. त्यानुसार वाघमारे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. पथकाने मुंबई-आग्रा रोड ते भारतनगर दरम्यानच्या रोडवर नांद्रेकर यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल व मॅग्झिन आढळून आले. मॅग्झिनमध्ये एक जिवंत काडतूस होते. पोलिसांनी त्यास अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.