घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादी कॉंग्रेस लागली कामाला; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केले सर्वेक्षण, 'हे' आले समोर...

राष्ट्रवादी कॉंग्रेस लागली कामाला; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केले सर्वेक्षण, ‘हे’ आले समोर…

Subscribe

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खा. देविदास पिंगळे यांची तर, दिंडोरी मतदारसंघासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. नितीन पवार यांची नावे पुढे आली. मात्र, निवडून येण्याची क्षमता व मतदारसंघातील राजकीय स्थितीच्या सर्वेक्षणानंतर निर्णय घेण्यावर या बैठकीत एकमत झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. एकिकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आघाडीतील तीनही पक्षांनी बैठक घेऊन वातावरण तापवायला सुरूवात केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. नुकतीच नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. संबंधित मतदारसंघांतून कोण जोरदार टक्कर देऊ शकतो, मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती, गेल्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते, महाविकास आघाडीतील घटकपक्षांचा विचार करता मतदारसंघात असलेली पक्षीय ताकद, शिवसेना, काँग्रेेसच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात अशा विविध मुद्द्यांवर वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते.

- Advertisement -

संभाव्य उमेदवार व जिंकून येण्याची क्षमता याची चाचपणी केल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचा विचार या बैठकीतून पुढे आल्याचे समजते. महिला उमेदवार म्हणून शेफाली भुजबळ यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार यांच्या नावाचा पर्याय असू शकतो.
या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, देवळालीच्या आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, माजी आमदार पंकज भुजबळ, दीपिका चव्हाण, माजी आमदार आसिफ शेख, अपूर्व हिरे, दिलीप खैरे, नाना महाले, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, अंबादास खैरे, समाधान जेजूरकर, अर्जून टिळे आदी उपस्थित होते.

नाशिक लोकसभा मतदारसंघात नेहमी सेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना बघायला मिळाला. सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता ही जागा शिवसेना उध्दव ठाकरे गटाला की, राष्ट्रवादीला याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. या मतदारसंघाची राजकीय स्थिती पाहता ६ पैकी २ मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पिंगळेच्या रूपाने बाजार समितीत सत्ता स्थापन केली. या सर्व बाबींचा विचार करता या जागेवर राष्ट्रवादी दावा करू शकते. परंतू सर्वेनंतरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

चांदवडची जागा राष्ट्रवादीकडे?

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ६ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादीचे आमदार आहेत. बाजार समिती निवडणुकीत मनमाड बाजार समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. देवळा, चांदवड जि.प गटात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे या जागेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत चांदवडची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

नवीन चेहर्‍याचा शोध

नाशिक लोकसभा मतदारसंघात खासदार गोडसे आणि देशपांडे यांचा अपवाद वगळता खासदार दुसर्‍यांदा रिपीट होत नसल्याचा इतिहास आहे, असा मुद्दा माजी आमदार हेमंत टकले यांनी मांडला. त्यामुळे जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर नवीन चेहर्‍याचाचा शोध घेण्याचाही मुद्दा यावेळी पुढे आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -