पुणे – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30 व्यक्तींना पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अरण्यऋषी म्हणून चित्तमपल्ली ओळखले जातात.
मारुती चित्तमपल्ली हे वनविभागातील नोकरीच्या निमित्ताने विदर्भात गेले आणि विदर्भाचेच होऊन राहिले. येथे त्यांची जंगल आणि वन्यजीवाशी मैत्री जुळली. त्यानंतर त्यांनी त्यांचे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित केले.
चित्तमल्लींच्या वडिलांना वाचनाची तर आईला रानवाटांची आवड
सोलापूरमधील गिरणी कामगाराच्या कुटुंबात 12 नोव्हेंबर 1932 साली मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांचा जन्म झाला. वडिलांना वाचनाचा छंद होता. शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. आपल्या मुलांनी विणकामाचे साचे चालवू नयेत, त्यांनी शिकावे ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती.
सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले. जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना 1990 साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
वनविभागातील नोकरीच्या निमित्ताने चित्तमपल्ली यांना जंगल आणि वन्यजीवांचा सहवास लाभला. चित्तमपल्ली यांना 18 भाषांचे ज्ञान आहे. त्यांनी निसर्ग, जंगल आणि वन्यजीव या जीवनानुभवावर 21 ग्रंथांचे लेखन केले.
चित्तमपल्ली यांची साहित्य संपदा
पक्षी जाय दिगंतरा (1983), जंगलाचं देणं (1985), रानवाटा (1991), शब्दांचं धन (1993), रातवा (1993), मृगपक्षिशास्त्र (1993), घरट्यापलीकडे (1995), पाखरमाया (2000), निसर्गवाचन (2000), सुवर्णगरुड (2000), आपल्या भारतातील साप (2000), आनंददायी बगळे (2002), निळावंती (2002), पक्षिकोश (2002), चैत्रपालवी (2004), केशराचा पाऊस (2005),चकवाचांदण : एक वनोपनिषद (2005), चित्रग्रीव (2006), जंगलाची दुनिया (2006), An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev (2000), नवेगावबांधचे दिवस (2010) अशी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्य जीवनावरील अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाचा मार्ग स्वीकारला.
हेही वाचा : Padma Award 2025 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाचा सन्मान?
पद्मश्री पुरस्कार कोणाला दिला जातो?
पद्मश्री पुरस्कार कला, शिक्षण, उद्योग, साहित्य,विज्ञान, खेळ, संशोधन, समाजसेवा यातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. एका वर्षांमध्ये 120 हून अधिक पुरस्कार दिले जात नाही.