Fake GST Racket : नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाकडून १९.८४ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघड

july gst collection second highest gst revenue collection at 1.49 lakh crore for july

नवी मुंबईच्या सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने काल ३० मार्च २०२२ रोजी १९ कोटी ८४ लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघड केला. या प्रकरणी मे. फॉर्च्युन ग्लोबल ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. सिंथेटिक रबरचा व्यापार करणाऱ्या या विक्रोळी स्थित खासगी कंपनीने ११० कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून बेकायदेशीररीत्या इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविले आणि त्याचा वापर केला.

मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या प्रधान मुख्य आयुक्त कार्यालयाच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नवी मुंबईच्या सीजीएसटी आयुक्तालयातील कर चुकवेगिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपरोक्त कंपनीविरुद्ध चौकशी सुरु केली. त्यातून असे दिसून आले की या कंपनीने अस्तित्वात नसलेल्या 8 कंपन्यांच्या नावाच्या खोट्या पावत्यांचा वापर करून प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवा न पुरवता फसवणुकीने ९ कोटी ९२ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवले आहे किंवा इतरांना दिले आहे.

सीजीएसटी कायदा २०१७ मधील  कलम ६९ अंतर्गत, कलम १३२(१) (ब)आणि (क) अंतर्गत या प्रकरणातील आरोपीला अटक करून आज ३१ मार्च २०२२ रोजी वाशीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि  त्याला १३ एप्रिल २०२२ पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने कर-चुकवेगिरीविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे.  प्रामाणिक तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या करदात्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्धेला तोंड द्यायला लावून आणि बनावट पावत्या जारी करून सरकारचा देय महसूल बुडवून कर-चुकवेगिरी करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोहिमेत कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा भाग म्हणून केलेल्या कारवाईत, सीजीएसटी नवी मुंबई आयुक्तालयाने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये ५०० कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील २० कोटी रुपये वसूल केले तसेच या संदर्भात १४ व्यक्तींना अटकदेखील केली.

अशाच प्रकारच्या आणखी एका प्रकरणात, ठाणे ग्रामीण सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ठाणेस्थित मे.मोटेक ट्रेडर्स या कंपनीने केलेल्या १७६ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्यामध्ये गुंतलेल्या एका जीएसटी व्यावसायिकाला अटक केली. या आरोपीला ३० मार्च २०२२ रोजी अटक करून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी करण्यात आलेली ही तिसरी अटक आहे.

सीजीएसटी विभागाचे अधिकारी कर चुकवेगिरी करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी डेटा विश्लेषणासारख्या साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण यांचा वापर करून मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सात महिन्यांत ११७० हून अधिक गुन्हे दाखल केले, ७४०० कोटी रुपयांच्या कर चुकवेगिरीची प्रकरणे शोधली, ८७५ कोटी रुपये वसूल केले तसेच ६७ व्यक्तींना अटक देखील केली. सीजीएसटी विभाग येत्या आर्थिक वर्षातदेखील प्रामाणिक करदात्यांना चुकीच्या स्पर्धेला तोंड द्यायला लावणाऱ्या आणि सरकारचा अधिकार असलेला महसूल बुडवून कर चुकवेगिरी करणाऱ्या तसेच आयटीसीबाबत फसवणूक करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.


हेही वाचा : CNG Price Down: १ एप्रिलपासून राज्यात CNG स्वस्त होणार, अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची उद्यापासून अंमलबजावणी