राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द

Navneet rana and ravi rana bail will be canceled due to bite to the media against thackeray government
राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द

खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांना मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाने काही अटींच्या आधारांवर जामीन मंजूर केला होता. या अटींचे उल्लंघन नवनीत राणा यांनी केलं असल्यामुळे त्यांचा जामीन रद्द केला जाऊ शकतो. जामीनावर सुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधू नये अशी अट राणा दाम्पत्याला घातली होती. परंतु राणा दाम्पत्याने माध्यमांशी संवाद साधताना त्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरसुद्धा टीकास्त्र डागलं आहे. लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे.

खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लिलावती रुग्णालयातून आज नवनीत राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयातून बाहेर पडल्यावर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी सामाजिक तेढ निर्माण केल्यामुळे अटक करण्यात आली होती. दरम्यान मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाने काही अटींच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे. यामध्ये माध्यमांशी बोलू नये आणि त्या प्रकरणावर भाष्य करु नये अशी अट होती. परंतु रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. यामुळे कोर्टाच्या अटींचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज रद्द होणार? 

नवनीत राणा यांनी कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केले असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. तसेच नवनीत राणा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनीत राणा यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात येऊ शकते अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यामध्ये कोर्टाच्या अटींचे उल्लंघन झाले का नाही याचा तपास मुंबई पोलीस करत आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

प्रभू श्रीरामाचे नाव घेणे, हनुमंताचे नाव घेणे चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे.14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकले तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी त्यानी महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवावी, नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान