अचलपूर विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख, बच्चू कडू यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे प्रवीण तायडे यांनी कडू यांना पराभूत केलं आहे. अमरावतीत बच्चू कडू यांच्या पराभवामागे राणा दाम्पत्य असल्याची चर्चा आहे. मात्र, मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला होता. याला माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देताना कडू यांना डिवचलं आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
“माझ्या पराभवाचे श्रेय राणांनी घेऊ नये. या निवडणुकीत महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते आणि पडलो असतो, तर त्याचे श्रेय राणांना दिले असते. ते म्हणतात, ‘बच्चू कडू को हमने गिराया.’ मला पाडायची त्यांची लायकी नाही. त्यांच्यात हिंमत असेल, तर कुठलीही निवडणूक माझ्याविरोधात अपक्ष म्हणून लढवून दाखवा,” असं आव्हान कडूंनी राणा दाम्पत्याला दिलं.
हेही वाचा : पहिल्यांदाच समोर आले शहाजीबापू, तीन नेत्यांना केलं टार्गेट; पराभवासाठी जिवलग मित्राला दिला दोष
दादा आता कसं वाटतं…
याला नवनीत राणा यांनी उत्तर देताना म्हटलं, “हे श्रेय माझे नाही. माझ्या जनतेनं बदला घेतलाय. दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं.”
“मी लहान आहे. पण, आता कसं वाटतं, तुमची लायकी काढली. स्वत:च्या मतदारसंघात दिवे लावले नाहीत. दुसरीकडे काय लावणार?” असा खोचक टोला नवनीत राणांनी लगावला आहे.
ते सांगतील तिथे उभा राहीन…
बच्चू कडूंच्या टीकेवर रवी राणा म्हणाले, “आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही. लोकांनी त्यांनी हटवलं आहे. ‘बच्चू कडू हटाव’ हा नारा लोकांनी दिला. त्यांनी म्हटलं होतं, ‘मी मुख्यमंत्री होईल.’ मात्र, त्यांनी आता बोलणं बंद करायला हवे. पाच वर्षानंतर मी बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन. ते सांगतील तिथे मी उभा राहीन. कडू कुणाच्या तरी पक्षात प्रवेश करतील. लोकसभेला त्यांनी मतांचे विभाजन केले. त्यामुळे जनतेने त्यांचा बदला घेतला.”
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी ‘CM’पदावरील दावा सोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट, म्हणाले, “बाबा…”