Video: राणा कुटुंबातील मुलांसहीत १० जणांना कोरोनाचा संसर्ग

Khar police filed chargesheet against Navneet Rana and Ravi Rana

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांच्या कुटुंबातील १० सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या मुला-मुलीचाही समावेश आहे. आमदार रवी राणा यांच्या आई-वडीलांना नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांचा कोरोनाच्या चाचणीचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा यांनी कुटुंबातील सर्व सदस्य, घरातील कर्मचारी आणि संपर्कात आलेले कार्यकर्ते अशा ५० ते ६० लोकांची कोरोना चाचणी केली होती. त्याचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यापैकी राणा यांची आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आढळल्यानंतर रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पुर्णपणे ढासळली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी केला होता. तर रवी राणा हे मागच्या काही महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात लोकांची मदत करण्यासाठी फिरत होते. यादरम्यान त्यांना प्रचंड ताप आला होता. मात्र त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

काल कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करतानाचा एक व्हिडिओ नवनीत कौर राणा यांनी ट्विट केला होता. यामध्ये त्या म्हणतात की, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर”. या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलाचा स्वॅब घेत असताना तो टाहो फोडत असल्याचे दिसत आहे.