अमरावती : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा सुरू आहेत. अनेक मुख्य नेते आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी प्रचारसभा घेत आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर सध्या राज्याच्या राजकारणात व्होट जिहादवरून गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. त्यातच काल अमरावतीमध्ये भाजपा नेत्या तसेच माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. प्रचारसभेत काही लोकांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. या हल्ल्यामध्ये त्यांचा अंगरक्षक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे. (Navneet Rana daryapur rada amravati.)
हेही वाचा : RokhThok : एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ अमित शहांनी संपवला, संजय राऊतांचा निशाणा
काल (शनिवारी) रात्री दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार अरुण बुंदीले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनीत राणा यांचे भाषण सुरु असताना काही लोकांनी खालून जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. त्यानंतर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणाचे काहीज न ऐकता घोषणा सुरू ठेवल्या. तेव्हा नवनीत राणांनी स्वत: त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता काही लोकांनी खुर्च्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात नवनीत राणांचा अंगरक्षक किरकोळ जखमी झाला आहे.
हेही वाचा : Sexual Assault : जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
यासंदर्भात स्वत: नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, खल्लारमध्ये आमची सभा सुरू होती. आम्ही शांततेमध्ये प्रचार करत होतो. माझे भाषण सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. माझ्या दिशेने बघून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र मी तेव्हाही शांत बसले, त्यानंतर काही वेळाने आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकल्या. भाषण झाल्यानंतर मी स्वत: त्यांच्याकडे समजवण्यासाठी गेली. मात्र, त्या लोकांनी माझ्यावरदेखील खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला.
तसेच या घटनेनंतर आम्ही गुन्हा दाखल केला असून, हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगितले. तसेच जर सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना अटक झाली नाही, तर अमरावतीत वेगळे चित्र बघायला मिळेल. आम्ही सगळेच रस्त्यावर उतरू, असा इशाराही नवनीत राणांनी यावेळी दिला आहे. तसेच याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Edited By Komal Pawar Govalkar